नागपूरमधील तणाव; सध्या कशी आहे परिस्थिती? पोलीस आयुक्तांनी दिली माहिती
Tension in Nagpur; What is the current situation? Police Commissioner gave information

नागपूरच्या महालमधील झेंडा चौकात दोन गटांत झालेल्या संघर्षानंतर काल मोठी जाळपोळ आणि गाड्यांची तोडफोड झाली होती.
यावेळी जमावाल पांगवताना एका गटातील लोकांनी पोलिसांवर दगडफेक केली. प्रत्युत्तरात पोलिसांनीही त्या गटावर अश्रूधुरांच्या नळकांड्या फोडून जमाव पांगवला. दरम्यान या घटनेत काही पोलीस कर्मचारीही जखमी झाले आहेत.
नागपूरमध्ये काल झालेल्या हिंसाचारानंतर शहरात सध्या काय परिस्थिती आहे, याबद्दल नागपूरचे पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंघल यांनी माहिती दिली आहे.
ते म्हणाले, “नागपूरमध्ये परिस्थिती नियंत्रणात असून शहरात सध्या शांतता आहे. या हिंसाचाराप्रकरणी आम्ही ५० हून अधिक लोकांना ताब्यात घेतले आहे. सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणाऱ्यांना आम्ही शोधून काढत आहोत.”
डॉ. रविंदर सिंगल यांनी पुढे सांगितले की, “या घटनेत ३३ पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. पोलिसांनी चांगले काम केले आहे. हिंसाचार करणाऱ्यांची ओळख पटवली जात असून, त्यांच्यावर कारवाई सुरू केली आहे.
कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर सर्व संबंधित कलमे लागू केली जाणार आहेत. नागपुरात पोलीस आणि इतर सुरक्षा दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. नागपूरच्या काही भागात संचारबंदी लागू आहे. अशी घटना पुन्हा घडू नये म्हणून संबंधित लोकांसोबत बैठक घेण्यात येणार आहे.”
नागपूरमध्ये सोमवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास घडलेल्या, घटनेचा परिणाम शहरातील सामान्य जनजीवनावर झालेला आहे. शहराच्या अनेक भागात संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे.
यासह शहरातील अनेक शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. संदीपानी आणि शाळा सेंटर पॉइंट स्कूल आणि अन्य शाळांचाही यामध्ये समावेश आहे. मात्र शिक्षण विभागाकडून शाळांना सुट्टीच्या सार्वजनिक सूचना अद्यापही आलेल्या नाहीत.
हंसरपुरी येथे झालेल्या हिंसाचाराबाबत प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, “आमच्या परिसरात काही समाजकटंक आले होते त्यांनी हा प्रकार केला आहे.
एक टोळी आली होती त्यांच्या चेहरा रुमालाने झाकलेला होता. त्यांच्या हाताता धारदार हत्यारे होती. त्यांनी परिसरात गोंधळ केला. घरे, दुकाने, वाहनांवर दगडफेक केली.”
औरंगजेबाच्या कबरीवरून सुरू असलेल्या वादातून नागपुरातील महाल परिसरात काल रात्री हिंसाचार उफाळून आला. दोन गट आमने सामने आल्याने तुफान दगडफेक आणि जाळपोळ करण्यात आली.
पोलिसांवरही हल्ला करण्यात आला. दरम्यान, आता नागपुरात तणावपूर्ण शांतता असून पोलिसांनी गस्त वाढवली आहे. पोलिसांनी अनेकांना ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी करण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही यासंदर्भात सखोल चौकशी करून कारवाई करण्याची आदेश पोलिसाना दिले आहेत. दरम्यान, नागपूरचे खासदार नितीन गडकरी यांनीही व्हिडिओ जारी करून नागरिकांसाठी महत्त्वाचं आवाहन केलं आहे.
“काही अफवा पसरल्यामुळे नागपूरमध्ये धार्मिक तणाव निर्माण होण्याची स्थिती निर्माण झाली आहे. या सर्व परिस्थितीत नागपूरमध्ये शांततेचा इतिहास ही नागपूरची विशेषतः राहिली आहे.
माझी सर्व बांधवांना विनंती आहे की त्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. शांतता प्रस्थापित करावी. कोणीही रस्त्यावर येऊ नये. कायदा आणि सुव्यवस्था राखावी.
सलोख्याचे आणि सौहार्दाचे नातं ठेवण्याची परंपरा कायम ठेवावी. ज्यांनी ज्यांनी चुका केल्या असतील किंवा गैरकायदेशीर कृत्य करणाऱ्यांवर सरकार कारवाई करेल”, असं आवाहन नितीन गडकरी यांनी केलं आहे.