सगळीकडे अजितदादांच्या हटके लूक ! ची चर्चा
Ajitdad's bad looks everywhere! Discussion of
विधिमंडळाच्या अधिवेशनाला आलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी मेट्रोतून सफर करीत सुटीचा आनंद लुटला.
विशेष म्हणजे मेट्रोतून प्रवास करताना शहराच्या हिरवळीची त्यांना भुरळ पडली. त्यांनी सोबत असलेले अधिकाऱ्यांपुढे शहराच्या हिरवळीचे कौतुक केले.
अजित पवार यांनी सीताबर्डी ते खापरीपर्यंत मेट्रोतून प्रवास केला. तत्पूर्वी त्यांनी सीताबर्डी इंटरचेंज स्टेशनची पाहणी केली. यावेळी त्यांनी मेट्रोतून प्रवास करणाऱ्या नागरिकांशीही गप्पा मारल्या.
मेट्रोतून प्रवासातून बसच्या तुलनेत किती पैशांची बचत होते, वेळ किती लागतो, आधी कार्यालयात जाण्यासाठी किती वेळ लागायचा आदी विचारपूस त्यांनी केली.
या नागरिकांना त्यांनी जास्तीत जास्त मेट्रोचा वापर करण्याचेही आवाहन केले. मेट्रोमध्ये आणखी काय सुविधा हव्या, याबाबतही त्यांनी विचारले.
थेट उपमुख्यमंत्रीच विचारणा करीत असल्याने नागरिकांनी बिनधास्तपणे त्यांच्याशी संवाद साधत मेट्रोतून प्रवासाने समाधानी असल्याचे सांगितले.
मेट्रो रेल्वेमुळे वेळेची व पैशाची बचत होत असल्याचे परभणी येथून नागपुरात नोकरीनिमित्त स्थायिक झालेल्या सुमित मोरे या प्रवाशाने सांगितले. केंद्र व राज्य शासनाकडून मेट्रो रेल्वे प्रकल्पात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली जाते.
त्यानुसार प्रवाशांना आवश्यक सोयी सुविधा पुरविण्याचे तसेच स्वच्छतेची सवय लावण्याच्या सूचना पवार यांनी महामेट्रोच्या अधिकाऱ्यांना केल्या.
दरम्यान, त्यांनी वर्धा मार्गाने खापरीपर्यंत प्रवास केला. या प्रवासादरम्यान मेट्रो ट्रॅकच्या दोन्ही बाजूला असलेल्या हिरवळीने त्यांच्या मनाला भूरळ पडली.
याचे त्यांनी कौतुकही केले. यावेळी त्यांच्यासमवेत मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डिकर, संचालक अनिल कोकाटे, राजीव त्यागी तसेच सारंग गडकरी उपस्थित होते.
अनेकांनी आतापर्यंत अजित पवार यांना पांढरे शर्ट, पॅंट किंवा पांढरा कुर्ता व पायजमा या पोषाखात पाहिले. आज मात्र त्यांचा पेहराव ‘हटके’ दिसून आला.
मेट्रोतून प्रवास करताना अजित पवार यांनी निळा, ग्रे रंगाचे चेक्सचे शर्ट आणि डोळ्यावर काळा गॉगल घातला होता. त्यामुळे स्टेशनवरील प्रवाशांत ‘दादा आज हटके लूक’मध्ये दिसत असल्याची चर्चा रंगली होती.