एकनाथ खडसेंनी पक्षात राहून चोऱ्या केल्या, त्यामुळे हाकलले ;मंत्र्यांचा गंभीर आरोप
Eknath Khadse stole while staying in the party, so he was kicked out; a serious accusation by the minister
एकनाथ खडसे यांचा राजीनामा हा दाऊदचा आरोप झाला म्हणून घेतला नव्हता. तर पक्षात राहून त्यांनी चोऱ्या आणि आर्थिक घोटाळे केले होते, त्यामुळं त्यांना पक्षाने हाकलून दिल्याचे वक्तव्य भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी केलं.
दाऊदच्या संभाषणामुळं आपल्याला पक्षातून काढलं असं एकनाथ खडसेंनी समजण्याची गरज नसल्याचे महाजन म्हणाले. एकनाथ खडसे ज्या फोटोवरुन आरोप करत आहेत
ते दहा वर्षांपूर्वीचे कुंभमेळा प्रसंगी मुस्लिम धर्मगुरुंच्या घरी असलेल्या विवाह सोहळ्यातील फोटो असल्याचे महाजन म्हणाले. सध्या एकनाथ खडसे हे आता मानसिक तणावात असल्याचे महाजन म्हणाले.
भोसरी भूखंड प्रकरण गौण खनिज उत्खनन प्रकरणात आलेल्या नोटीसमुळं एकनाथ खडसेंची परिस्थिती केविलवाणी झाली आहे. काय बोलावं हे आता एकनाथ खडसेंना कळत नाही.
त्यामुळं वाटेल ते बेछूट आरोप ते करत आहेत. एकनाथ खडसे यांच्या आरोपाला आम्ही किंमत देत नसल्याचे महाजन म्हणाले.
एकनाथ खडसे एकेकाळी आमच्यासोबत होते त्यामुळं ते आमचे सहकारी होते. मात्र, आता त्यांची कीव करावी वाटत नसल्याचे महाजन म्हणाले. एकनाथ खडसेंमुळं त्यांच्या घरच्या लोकांनाही भोगावे लागले. एकनाथ खडसे हे वैफल्यग्रस्त झाले्याचे महाजन म्हणाले.
10 वर्षांपूर्वी कुंभमेळा प्रसंगी मुस्लिम धर्मगुरु यांच्या विवाह सोहळ्यात सर्व आमदार खासदार सर्व प्रतिष्ठित लोक उपस्थित होते. त्या लग्नात काही लोक आक्षेपार्ह होते असे आरोप होत आहेत.
मात्र त्याबाबत आम्हाला कल्पना नाही. त्या विवाह सोहळ्यात आम्ही सर्व उपस्थित होतो, हे आम्ही मान्य करतो. हे यापूर्वीही याविषयी चर्चा झालेली आहे. त्यामुळं हा नवीन विषय नाही.
वैफल्यग्रस्त परिस्थिती झाल्यामुळे काहीतरी बोलायचं म्हणून अशा प्रकारे आरोप केले जात असल्याचे महाजन म्हणाले. एकनाथ खडसेंची परिस्थिती वैफल्यग्रस्त झाल्याने सकाळपासून संध्याकाळपर्यंत खडसे बडबड करत असतात असे महाजन म्हणाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार देखील म्हटले की, मराठा समाजाला आरक्षण द्यायचे आहे ते शंभर टक्के द्यायचे आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी देखील आरक्षण दिलं होतं. मात्र, ठाकरे सरकारने न्यायालयात ते टिकवलं नसल्याचे महाजन म्हणाले. आता टिकणारं आरक्षण द्यायचं आहे.
त्यासाठी थोडा वेळ जरी अजून आम्हाला लागला तर तो द्यावा असे महाजन म्हणाले. आरक्षणाबाबत सरकार गतीने काम करत आहे. जरांगे पाटील यांना देखील हे पटलेलं असून त्यामुळं जरांगे यांच्याकडून मुदतवाढ मिळेल असे महाजन म्हणाले.
सुप्रीम कोर्टात याबाबत विषय सुरु आहे. लवकरच निर्णय होणार असल्याचे महाजन म्हणाले. मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत झालेली चर्चा ही सकारात्मक झाली आहे.
दरम्यान देशद्रोहाच्या आरोपावरून सुधाकर बडगुजर यांची एसआयटी चौकशी केली जात आहे, त्याचप्रमाणे गिरीश महाजन यांची देखील एसआयटी चौकशी झाली पाहिजे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांनी केली आहे.
सलीम कुट्टा प्रकरणात भाजपकडून शिवसेना ठाकरे गटावर टीका केली जात असताना आता खडसे यांनी गिरीश महाजन यांच्यावर निशाणा साधला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांनी महाजनांवर टीका केली. त्यांनी म्हटले की, तथ्य नसताना सुद्धा माझ्यावर दाऊदच्या बायकोसोबत संभाषण झाल्याचा आक्षेप हा घेण्यात आला होता.
त्यानंतर माझी चौकशी करण्यात आली होती. आता फोटोच्या माध्यमातून गिरीश महाजन यांचा सलीम कुट्टा याच्याशी संबंध दिसत आहे.
देशद्रोहींशी गिरीश महाजन यांचे सरळ संबंध आहे का असा प्रश्न खडसे यांनी उपस्थित केला आहे. एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजनांची एसआयटी चौकशी करण्याची मागणी केली आहे.
माझ्यावर त्यावेळी आरोप झाले त्यावेळी पक्षाने माझा राजीनामा घेतला होता. आता गिरीश महाजन यांच्यावर देशद्रोहाचे आरोप होत आहेत व ते पुराव्यानिशी समोर देखील येत आहे त्यामुळे
मंत्रिमंडळात असताना गिरीश महाजन यांची चौकशी कशी होऊ शकेल? असा प्रश्न देखील एकनाथ खडसेंनी उपस्थित करत गिरीश महाजन यांनी राजीनामा द्यावा
अशी मागणी खडसे यांनी केली. मात्र, आता भाजपच्या भूमिकेप्रमाणे गिरीश महाजन ही भाजपच्या वॉशिंग मशीन मधून स्वच्छ होऊन बाहेर येतात की काय अशी उपरोधिक टीकाही त्यांनी केली.
शरद पवार यांनी काय केलं त्यापेक्षा तुम्ही आता काय करता याला जास्त महत्त्व असून मराठ्यांना आरक्षण फक्त आम्ही देऊ शकतो अशी राहणार भीमदेवी गर्जना तुम्ही केली होती
त्यामुळे टोलवाटोलवी करण्यापेक्षा तुम्ही काय दिवे लावत आहात हे महाराष्ट्राला समजलं पाहिजे असा टोला एकनाथ खडसेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे.