सौदी अरेबियाचा मोठा निर्णय; भारतासह १४ देशांवर व्हिसा बंदी
Saudi Arabia's big decision; Visa ban on 14 countries including India

सौदी अरेबियाने भारत आणि पाकिस्तानसह १४ देशांच्या तात्पुरत्या व्हिसावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये उमरा, व्यवसाय आणि कुटुंब व्हिसावर बंदी घालण्यात आली आहे.
सौदी अरेबियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने हा निर्णय घेतला असल्याची माहिती समोर आली आहे. हे निर्बंध जूनपर्यंत कायम राहणार असून ज्यांच्याकडे उमरा व्हिसा आहे
ते १३ एप्रिलपर्यंत सौदी अरेबियात प्रवेश करू शकणार आहेत. या वर्षीच्या हज यात्रेच्या आधी सौदी अरेबियाने हा मोठा निर्णय घेतला आहे.
सौदी अरेबियामधील अधिकाऱ्यांनी या निर्णयासंदर्भात माहिती देताना सांगितलं की, हज यात्रेशी संबंधित गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी आणि योग्य नोंदणी केल्याशिवाय
देशात प्रवेश करणाऱ्या व्यक्तींना रोखण्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच गेल्या वर्षी हज यात्रेत उष्णतेमुळे अनेकांच्या मृत्यूची घटना घडली होती.
अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती त्यांनी सांगितली आहे. या संदर्भातील वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे.
दरम्यान, २०२४ मध्ये हज यात्रा करताना तीव्र उष्णतेमुळे अनेक लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली होती. तसेच तेव्हा अनेक हज यात्रेकरूंनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती,
तसेच अनेकांनी नोंदणी देखील केली नसल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे अशा घटना टाळण्याच्या अनुषंगाने आता सौदी अरेबिया सरकार उपयायोजना करत असल्याचं सांगितलं जात आहे. या संदर्भात सौदी अरेबियाचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी योग्य ते निर्देश दिले आहेत.
वृत्तानुसार, सौदी अरेबियाने १४ देशांच्या व्हिसावर तात्पुरत्या स्वरुपाची बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये भारत, पाकिस्तान, बांग्लादेश, इजिप्त, इंडोनेशिया, इराक, नायजेरिया, जॉर्डन, अल्जेरिया, सुदान, इथिओपिया, ट्युनिशिया, येमेन या देशांचा समावेश आहे.