मराठवाड्यातील ठाकरे सेनेच्या दोन नेत्यांमध्ये खडाजंगी ;उद्धव ठाकरेच्या डोक्याला ताप
Clashes between two leaders of Thackeray Sena in Marathwada; Uddhav Thackeray has a fever

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून नेत्यांची गच्छंती थांबता थांबेना. त्यात आता संभाजीनगरमध्ये चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांच्यातील वाद विकोपाला गेलेला आहे.
अंबादास दानवे पक्ष संपवत आहेत, ते मला विचारत नसून ते मस्तीत आल्याचा धक्कादायक आरोप चंद्रकांत खैरेंनी केलाय.
मी अंबादास दानवेंची मातोश्रीवर तक्रार करणार असून त्यांच्यावर कारवाई करायला लावणार असेही चंद्रकांत खैरे म्हणाले. शिवसेनेत आता उभी फूट पडली असल्याचं दिसतंय.
शिवसेनेची पडझड झाल्यानंतर मराठवाड्यात उद्धव ठाकरेंकडे अवघे 2 नेते उरले आहेत. मात्र यांच्यातून विस्तवही जात नाही असे चित्र निर्माण झालंय.
खैरे यांनी अंबादास दानवेंवर सडकुन टीका करीत त्यांच्यावर पक्षाकडून कारवाई करण्याची मागणी त्यांनी केलीय. त्यांनी पक्षाचे नुकसान केलं असून पक्ष जिवंत ठेवायचा असेल तर उद्धव ठाकरेना दानवेंवर कारवाई करावी लागेल, असेही खैरे म्हणाले.
दानवे मस्तीत आले आहेत. याचमुळे अनेक लोक पक्ष सोडून गेले. 2019 आणि 2024 मध्ये दानवे यांनी माझा लोकसभा निवडणुकीत पराभव केला.
विधानसभेत मला न विचारता तिकीट वाटले आणि पक्षाचे पानिपत केले. दानवे सातत्याने मला टाळतात, गटबाजी करतात, पक्ष कमजोर करतायत, असे खैरे म्हणाले.
रविवारच्या मेळाव्याचे मला आमंत्रण नव्हते मला साधा कुणी फोनही केला नसल्याची खंत खैरेंनी बोलून दाखवली. दानवे विरोधी पक्ष नेता म्हणून उपयोग नाही, अँडजस्टमेंट करणारा नेता आहे, त्यातून ते श्रीमंत होत असल्याचा गंभीर आरोप खैरेंनी केलाय.
या सर्व आरोपावर अंबादास दानवे मात्र शांत आहेत. खैरे पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत त्यावर मी बोलणार नाही. माझ्यावर कारवाई करा असं ते म्हणतायत, तर त्याचा निर्णय पक्षप्रमुख घेतील असेही दानवे म्हणाले.
खैरे यांनी या आधी ही दानवेवर टीका केलीय. त्यामुळं खैरे पक्ष सोडणार अशाही चर्चा सुरू झाल्या. पालकमंत्री शिरसाठ यांनी तर खैरे थेट पक्षात आले तर स्वागत आहे अशी भूमिका घेतली होती.
मात्र यावर खासदार भुमरे यांनी वेगळी भूमिका घेतली आहे खैरेंसाठी दार बंद आहेत असे भुमरे म्हणाले..खैरे आणि दानवे वाद जुनाच आहे
त्यात आता रविवारी खैरेंना शिवसेनेच्या मेळाव्याला न बोलावण्याने यात भर पडलीय. आगामी काळात यामुळं उद्धव ठाकरे गटाचे नुकसान मात्र होणार हे अटळ आहे.