फडणवीस सरकारमध्ये नाराजी;शिंदे तडकाफडकी ठाण्याला तर अजित दादाही गेले निघून
Dissatisfaction in Fadnavis government; Shinde rushed to Thane, Ajit Dada also left

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा नाराजीनाट्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. महायुतीचे विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक आमदार निवडून आल्याने हे सरकार भक्कम असल्याचं मानलं जात आहे.
असं असलं तरी या सरकारमध्ये सातत्याने नाराजीनाट्याच्या घडामोडी बघायला मिळतात. महायुतीत सातत्याने विविध मुद्द्यांवर मतभेद असल्याचं बघायला मिळतं. नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा अद्याप सुटलेला नाही.
नुकतंच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आले. या दौऱ्यादरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे असणाऱ्या अर्थखात्याबाबत तक्रार केल्याची चर्चा आहे.
अर्थखात्याकडून शिवसेना मंत्री आणि आमदारांच्या फाईली वेळेवर मंजूर होत नसल्याची तक्रार शिंदेंनी शाह यांच्याकडे केली.
तर शाहांनी शिंदेंना यापुढे तसं होणार नाही, असं आश्वस्त केलं. नाराजीनाट्याची ही एक घटना ताजी असतानाच आज आणखी एक घटना घडली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज मुंबईत चैत्यभूमीवर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह महायुती सरकारमधील विविध मंत्री आणि दिग्गज नेते उपस्थित होते. या कार्यक्रमात एक धक्कादायक प्रकार बघायला मिळाला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केल्यानंतर राज्यपाल, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मंचावर आले. यावेळी कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाषण केलं. नंतर राज्यपाल राधाकृष्णन यांनी भाषण केलं. यानंतर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना भाषणासाठी बोलावण्यात आलं नाही.
विशेष म्हणजे कार्यक्रमपत्रिकेत एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोन्ही नेत्यांचं भाषण होईल, असा उल्लेख होता. त्यासाठी वेळ देखील ठरली होती.
कार्यक्रम पत्रिकेनुसार, राज्यपालांच्या भाषणानंतर 10 वाजून 10 मिनिटांनी अजित पवार यांच्या भाषणासाठी वेळ ठरली होती. तर एकनाथ शिंदे यांच्यासाठी 10 वाजून 15 मिनिटांची वेळ देण्यात आली होती.
दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना भाषणासाठी प्रत्येकी 5 मिनिटे देण्यात आली होती. पण दोन्ही नेत्यांना यावेळी भाषणातून वगळण्यात आलं.
भाषणासाठी आपलं नाव घेण्यात न आल्यामुळे एकनाथ शिंदे यांनी अधिकाऱ्यांना याबाबत प्रश्न विचारला. त्यावर अधिकाऱ्यांनी तुमचं नाव भाषणाच्या पत्रिकेत नव्हते असं म्हटलं.
यावर एकनाथ शिंदे यांनी कार्यक्रमपत्रिकेचा दाखला दिला. पण संबंधित कार्यक्रम पत्रिकेत काल रात्रीच बदल करण्यात आली आणि नव्या कार्यक्रमपत्रिकेत केवळ राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांचं नाव भाषणासाठी असल्याचं अधिकाऱ्यानं मुख्यमंत्र्यांना सांगितलं.
विशेष म्हणजे कार्यक्रमात भाषणासाठी तुमचं नाव नसल्याची कल्पना तुम्हाला दिली नव्हती का? असा उलटसवालच अधिकाऱ्याने शिंदेंना केला.
यानंतर आता शिंदे यांच्याकडून कार्यक्रमपत्रिका बदलणाऱ्या अधिकाऱ्याची चौकशी केली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
दुसरीकडे कार्यक्रम संपल्यानंतर अजित पवार थेट निघून गेले. तर एकनाथ शिंदे यांनी ठाणे येथील निवासस्थानी येत पत्रकार परिषद घेतली.
एकनाथ शिंदे यांना पत्रकार परिषदेत पत्रकारांनी तुमची नाराजी आहे का? असा प्रश्न विचारला. त्यावर शिंदेंनी प्रतिक्रिया दिली. “अरे बाबा, चैत्यभूमीला जाणं,
बाबासाहेबांचं दर्शन घेणं, बाबासाहेबांना विनम्र अभिवादन करणं यापेक्षा दुसरं काय मोठं असू शकतं? त्यामुळे आज बाबासाहेबांची जयंती चैत्यभूमीला साजरी झाली.
आम्ही सगळे गेलो. इथे साजरी झाली. वेगवेगळ्या ठिकाणी साजरी होत आहे. हजारो-लाखो ठिकाणी बाबासाहेबांची जयंती साजरी होते. याचा आनंद प्रत्येकाला आहे. तशी मलाही आहे”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.