पहलगाम हल्ल्याबाबत शरद पवार यांचे मोठे विधान

Sharad Pawar's big statement regarding Pahalgam attack

 

 

 

जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर आता भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध कमालीचा ताणलेले आहेत. दोन्ही देशांनी एकमेकांवर वेगवेगळे निर्बंध घातले आहेत.

 

यावरच आता खासदार शरद पवार यांनी महत्त्वाचं भाष्य केलं आहे. पाकिस्तान अॅक्शन घेईल याची मला शंका होती, ती खरी ठरली असं भाष्य शरद पवारांनी केलंय.

 

“पहलगाम हल्ल्यानंतर भारताने एकूण पाच निर्णय घेतले. एका दृष्टीने पाकिस्तानला एक मेसेज देण्याचं काम भारताने केलं. आता पाकिस्ताननेही काही निर्णय घेतलेत.

 

भारताचं विमान त्यांच्या देशात जाणार नाही हे त्यांनी ठरवलं आहे. आपल्या विमानांना पाकिस्तानमधून प्रवास करावा लागतो. आता ते बंद केलं तर आपल्याला दूरच्या मार्गाने जावं लागेल.

 

त्यामुळे प्रवास आर्थिकदृष्ट्या अधिक महाग होईल. आपण निकाल घेतले त्याचा परिणाम पाकिस्तानवर होईल. पण पाकिस्तान गप्प बसेल असं नव्हे. तेही अॅक्शन घेतील. ही शंका मला होती, ती खरी ठरली,” असे मत शरद पवार यांनी व्यक्त केले.

पहलगाममधील झालेल्या हल्ल्यानंतर काश्मीरच्या पर्यटनावरही परिणाम होणार आहे. त्यावरही शरद पवार यांनी मत व्यक्त केलं. “पहलगाममध्ये हल्ला झाला, तेव्हा काश्मीरचे लोकं रस्त्यावर उभे राहिले.

 

भारताच्या बाजूने उभे राहिले. ही जमेची बाजू आहे. जे लोक भारताच्या बाजूने उभे राहिले त्यांचा चरितार्थ हा कदाचित संकटात जाईल अशी स्थिती आहे. याचीच मला काळजी याची आहे.

 

काश्मीरचं अर्थकारण संकटात येईल. लोक पर्यटनाला जाणार नाहीत. याचा परिणाम काश्मीरच्या लोकांवर होईल. लोक काश्मीरला जाणार नाहीत.

 

त्याची झळ स्थानिकांना बसेल, असे मत शरद पवार यांनी व्यक्त केले. तसेच काश्मीरमधील पर्यटन वाढावे तसेच तेथील स्थानिकांचा चरितार्थ भागावा यासाठी केंद्राने अधिक लक्ष दिलं पाहिजे, अशी मागणीही त्यांनी व्यक्त केली.

 

या हल्ल्यात २६ पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या हल्ल्याने संपूर्ण देश हादरला. या हल्ल्यानंतर केंद्र सरकारकडून सुरक्षा यंत्रणेत चूक झाल्याचे मान्य करण्यात आले.

 

यानंतर विविध प्रतिक्रिया समोर येत आहे. आता याप्रकरणी राष्ट्रवादी पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भाष्य केले आहे. काल बैठकीत जे काही निर्णय घेतले जातील, त्यात आम्ही सरकार सोबत आहोत. पण सरकारने हे अधिक गांभीर्याने पाहिलं पाहिजे, असे शरद पवार म्हणाले.

 

शरद पवार यांनी नुकतंच पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी पहलगाममध्ये केंद्र सरकारकडून सुरक्षा यंत्रणेत चूक झाल्याचे मान्य केल्याबद्दल प्रतिक्रिया दिली. “दोन तीन गोष्टी आहे.

 

काल काश्मीरमध्ये जे झालं, त्या प्रश्नाकडे सर्व देशवासियांनी एका विचाराने सरकार बरोबर राहिलं पाहिजे. त्यात राजकारण आणायचं नाही. अतिरेक्यांनी अॅक्शन घेतली ती भारत विरोधी आहे.

 

देशाविरोधात जेव्हा अॅक्शन होते तिथे राजकीय मतभेद ठेवायचे नसतात. काल बैठक होती. सर्व पक्षीय होते. आमच्या पक्षाकडून सुप्रिया सुळे होत्या.

 

सर्व राजकीय पक्षांनी या प्रश्नावर केंद्र सरकारला सहकार्य करण्याची भूमिका घेतली याचा आनंद आहे. माझी विनंती आहे की, जे काही निर्णय घेतले जातील त्यात आम्ही सरकार सोबत आहोत. पण सरकारने हे अधिक गांभीर्याने पाहिलं पाहिजे”, असे शरद पवार म्हणाले.

 

“आम्ही दहशतवाद संपवला, आता काही चिंता नाही असं सांगितलं जात होतं. पण ठिक आहे, असं काही होत असेल तर आनंद आहे. पण उदाहरण पाहिलं आपण याचा अर्थ कुठे ना कुठे तरी अजूनही कमतरता आहे.

 

ती कमतरता घालवली पाहिजे. देशावर हल्ला झाला असेल, सरकार गांभीर्याने निर्णय घेत असेल आणि कमतरता आहे असं मान्य करत असेल तर तातडीने ती कमतरता काढली पाहिजे. त्याही कामात आम्हा लोकांचं सरकारला सहकार्य राहील”, असेही शरद पवारांनी सांगितले.

 

“सरळ आहे ना. पहलगाम हे ठिकाण अधिक सेफ आहे. दोन तीन महिन्यांपूर्वी मी गेलो होतो. सातत्याने आपले लोक जातात. हे घडलं ते पहलगामला घडलं.

 

याचा अर्थ दहशतवादी प्रवृत्तीविरूद्ध आपण यश मिळवलंय असा निष्कर्ष आपण काढत आहोत तर तो थोडा सावध काढला पाहिजे. आणि काळजी घेतली पाहिजे”, असेही शरद पवारांनी स्पष्ट केले.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *