कडाक्याच्या थंडीचा हवामान विभागाचा इशारा
Met department warning of severe cold

मागील दोन आठवड्यांपासून देशाच्या दक्षिणेकडे असणाऱ्या तामिळनाडूमध्ये पावसानं थैमान घातलं असून, हे चित्र नव्या आठवड्याच्या सुरुवातीलासुद्धा कायम राहणार असल्याचा इशारा हवामान विभागानं वर्तवला आहे.
किंबहुना तामिळनाडूला पुढील 24 तासांसाठी पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. कन्याकुमारी, तिरुन्नेलवेल्ली, थूथकुडी आणि तेनकसी या जिल्यांसाठी हा इशारा लागू असेल.
इथं महाराष्ट्रात मात्र दक्षिणेकडील हवामानापेक्षा जास्त प्रभाव उत्तरेकडी शीतलहरींचाच असल्याचं पाहायला मिळत आहे.
सध्या देशातील उत्तरेकडे असणाऱ्या राज्यांमध्ये थंडीचा कडाका प्रचंड वाढला आहे. काही भागांमध्ये तर जोरदार बर्फवृष्टीही सुरु आहे.
परिणामस्वरुप महाराष्ट्राच्या दिशेनं येणाऱ्या या शीतलरहींचा परिणाम राज्यातील तापमानावर होताना दिसत आहे. निफाडमध्ये थंडी वाढली असून, 11.3 अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद करण्यात आली आहे.
पुढच्या दोन दिवसांत निफाडसह राज्याच्या विदर्भ पट्ट्यामध्ये थंडीचा कडाका वाढणार असल्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.
विदर्भात बहुतांश जिल्ह्यांतील किमान तापमान 14 अंशांवर पोहोचेल. तर, उत्तर महाराष्ट्रातही थंडीचा कडाका वाढणार आहे.
दक्षिण आणि पश्चिम महाराष्ट्र मात्र या थंडीच्या वातावरणाला अपवाद ठरत असून, इथं तूर्तास किमान तापमानात कोणतीही घट होण्याची चिन्हं नसल्याची बाब समोर येत आहे.
गेल्या महिनाभरापासून देशातील हवामानात सातत्यानं बदल होत आहे. कुठं थंडीचा गारठा, तर कुठे ढगाळ वातावरण आहे. राज्यात अवकाळी पावसाने देखील धुमाकूळ घातला आहे.
तामिळनाडूतील काही जिल्ह्यांमध्ये ढगफुटीसदृश्य पाऊस झाल्याने रस्त्यांना नद्यांचं स्वरुप आलं आहे. पावसामुळे थुथुकुडी आणि तिरुनेलवेली जिल्ह्यात जनजीवन विस्कळीत झालं आहे.
दरम्यान, पुढील २४ तासांत देशातील अनेक राज्यांमध्ये अवकाळी पाऊस होईल, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे.
आयएमडीने दक्षिणी तामिळनाडू, दक्षिण केरळ आणि लक्षद्वीपला अलर्ट जारी केला आहे. याठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस होईल, असं सांगण्यात आलं आहे.
याशिवाय तामिळनाडू आणि केरळमध्ये सुरू असलेल्या अवकाळी पावसाचा जोर कमी होईल. उत्तर तामिळनाडू, उत्तर केरळ आणि अंदमान निकोबार बेटांवर हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे. दुसरीकडे मागील दोन दिवसांत राजधानी दिल्लीतील तापमानाचा पारा घसरला आहे.
सोमवारी दिल्लीत किमान तापमान ७.१ नोंदवलं गेलं आहे. एनसीआर, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि राजस्थानसह संपूर्ण उत्तर भारतातील भागात तापमानात घट दिसून आली आहे.
त्यामुळे नागरिकांना हुडहुडी जाणवत आहे. पुढील चार दिवस दिल्लीतील ढगाळ वातावरण राहिल, असं हवामान खात्याने सांगितलं आहे.
तामिळनाडूत अवकाळी पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. IMDच्या माहितीनुसार, मागील २४ तासात तामिळनाडूतील काही जिल्ह्यांमध्ये ढगफुटीसदृश्य पाऊस झाला आहे.
पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं असून शेकडो घरे पाण्याखाली गेली आहेत. हवामान खात्याने आज देखील तामिळनाडूत अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.