14 बीएलओंवर गुन्हा दाखल
A case has been registered against 14 BLs

निवडणूक कामात कसूर केल्याच्या आरोपावरून मालेगाव बाह्य मतदारसंघात कामकाज करणाऱ्या १४ बीएलओंवर छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारयाद्यांचे शुद्धीकरण, दुबार नावे, फोटो वगळणे आदी कामकाज सुरु आहे. मतदान प्रक्रियेशी निगडित कामे प्रथम प्राधान्याने करणे अपेक्षित असताना १४ बीएलओंनी संबंधित कामकाज पूर्ण केले नाही.
तसेच आढावा बैठकांना सातत्याने गैरहजर राहून कामाकडे दुर्लक्ष केले. निवडणूक कामकाजासंदर्भात संबंधितांनी नोटीस बजावून देखील या १४ बीएलओंनी प्रतिसाद न दिल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्यांच्याऐवजी दुसऱ्या बीएलओंची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती तहसीलदार नितीनकुमार देवरे यांनी यांनी दिली आहे.
मालेगाव बाह्य मतदारसंघात एकूण ३३१ बुथस्तरावर बीएलओंची नियुक्ती करण्यात आली आहे. मतदान प्रक्रियेशी निगडित कामे प्रथम प्राधान्याने करणे अपेक्षित आहे.
१४ बीएलओंनी मतदारयादीशी संबंधित कामकाज व घरोघरी जाऊन मतदारांची पडताळणी केली नाही. त्यांना वारंवार सूचना देण्यात आल्या.
त्यानंतर नोटीसही बजावल्या होत्या. त्यालाही त्यांनी दाद न देत कामात कसूर करण्याचे धोरण कायम ठेवल्याने त्यांच्याविरुद्ध लोकप्रतिनिधित्व कायदा १९५० चे कलम ३२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निवडणुकीच्या कामात प्रत्येक कर्मचाऱ्याने जबाबदारीने आपले कर्तव्य पूर्ण करणे गरजेचे आहे. कामात कसूर करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असे तहसीलदार तथा मालेगाव बाह्यचे सहायक मतदार नोंदणी अधिकारी देवरे यांनी सांगितले आहे.