काँग्रेस नेत्याचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा,आजपासून तुम्ही हिशेब करायला सुरू करा
Congress leader's warning to government officials, you should start accounting from today

विधानसभेची निवडणूक तोंडावर आली आहे. विधानसभेच्या निवडणुकीसाठी आचारसंहिता लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला जोरदार सुरुवात केली आहे.
सध्या अनेक नेत्यांचे महाराष्ट्रभर दौरे सुरु आहेत. या दौऱ्यांच्या माध्यमातून सभा आणि मेळावे सुरु आहेत. विधानसभेला महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा प्रमुख सामना रंगण्याची शक्यता आहे. निवडणुकीच्या आधीच राज्यात राजकारण तापलं आहे.
अशातच काँग्रेसचे नेते तथा माजी मंत्री सुनील केदार यांनी नागपूरमधील एका कार्यक्रमात बोलताना महायुती सरकारवर हल्लाबोल केला.
यावेळी त्यांनी सरकारी अधिकाऱ्यांनाही इशारा दिला. “अधिकाऱ्यांनी देखील लक्षात ठेवावं आजपासून तुम्ही हिशेब करायला सुरु करा”, असा इशारा सुनील केदार यांनी दिला आहे.
“सरकारमधील काही अधिकारी वर्ग आहे, त्या अधिकारी वर्गाने भाजपाचा युनिफॉर्म घातला आहे. काही आयएएस अधिकारी, काही आयपीएस अधिकारी आणि कमिश्नर या लोकांना सांगावं लागेल तुम्ही ज्या पद्धतीने वागत आहात,
भारतीय जनता पक्षाच्या भरोशावर तुम्ही सर्वसामान्य लोकांना छळण्याचं काम तुम्ही करत आहात. मात्र, आमचं सरकार (महाविकास आघाडीचं) दोन महिन्यांत येणार आहे.
त्यामुळे आजपासून हिशेब लिहून ठेवायला सुरुवात करा. तुम्हाला तेव्हा सांगू. मी तर ठरवलं आहे की, उद्धव ठाकरे साहेब एकदा तरी हे जे आयएएस आणि
आयपीएस अधिकारी आहेत त्यांना एकदा भाजपाचा ड्रेस घालायला लावू आणि सॅल्युट मारायला लावू”, असं सुनील केदार यांनी म्हटलं आहे.
“५० खोके आणि एकदम ओके वाल्यांना घरी कशा पद्धतीने आपण पाठवतो ही भूमिका महत्वाची आहे. काही अधिकाऱ्यांच्या भरोशावर विरोधकांना नाकीनऊ आणण्याची भूमिका या सरकारने घेतली आहे.
मात्र, वेळप्रसंगी त्या अधिकाऱ्यांनी लक्षात ठेवावं आजपासून तुम्ही हिशेब करायला सुरु करा, दिवस संपत आले आहेत. ज्यावेळी आम्ही सरकारमध्ये येऊ त्यावेळी आम्ही हिशेब करू”, असा इशारा सुनील केदार यांनी सरकारी अधिकाऱ्यांना दिला आहे.