मिलिंद देवरांना पक्षात घेण्याचे आदेश दिल्लीतून ? एकनाथ शिंदेंना आदेश कोणाचा ?चर्चाना उधाण !
मिलिंद देवरा यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आणि काँग्रेसला मोठा धक्का दिला. मात्र या पक्षप्रवेशानंतर पडद्यामागे नेमकं काय घडलं याबाबत अनेक गोष्टी सूत्रांच्या माध्यमातून समोर येत आहेत.
मिलिंद देवरा यांनी शिवसेना शिंदे गटात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. मात्र मिलिंद देवरा यांच्या पक्षप्रवेशाचा निर्णय दिल्लीतून झाल्याची माहिती आता सूत्रांकडून मिळत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना याबाबत माहिती देखील नव्हती.
दक्षिण मुंबईची जागा कुणी लढवायची याबाबत महाविकास आघाडीत रस्सीखेच सुरु होती. विद्यमान खासदार अरविंद सावंत यांच्यासाठी ठाकरे गटाने या जागेवर दावा केला होता.
तर काँग्रेसकडून मिलिंद देवरा येथून निवडणूक लढण्यास इच्छूक होती. मात्र ठाकरे गटाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने मिलिंद देवरा यांनी अखेर धक्कादायक निर्णय घेत, महाविकास आघाडीला आव्हान देण्याची शक्यता आहे.
शिंदे गटाकडून या जागेसाठी यशवंत जाधव किंवा आमदार यामिनी जाधव यांचा विचार सुरू होता. मात्र दिल्लीतून सूत्र फिरली
आणि शिंदेंना देवरा यांना पक्षात घ्यावे लागले. मिलिंद देवरा यांच्या प्रवेशानंतर दक्षिण मुंबईतून तेच महायुतीचे उमेदवार असतील अशी चर्चा आहे.
दक्षिण मुंबई हा मतदारसंघ मागील दोन टर्म शिवसेनेकडे आहे. त्यामुळे महायुतीत जागावाटपावरुन वाद टाळण्यासाठी भाजपने सामजस्यांची भूमिका घेतली असावी.
याशिवाय जर मिलिंद देवरा यांचा पक्षप्रवेश दिल्लीतून झाला असेल तर उमेदवार जरी शिवसेनेचा असला तरी भाजपच्या जवळचा असेल, ही बाब महत्त्वाची आहे.
मिलिंद देवरा यांनी शिंदे गटात प्रवेश करण्याआधी ठाकरे गटाशी संपर्क साधला होता. दक्षिण मुंबई मतदारसंघातून लोकसभेच्या उमेदवारी मागणी देवरा यांनी केली होती,
असा मोठा दावा खासदार विनायक राऊत यांनी केला. मात्र उद्धव ठाकरे दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत यांच्या पाठीशी उभे राहिले, असं राऊत यांनी म्हटलं.