ऐन निवडणुकीत इन्कम टॅक्स विभागाची काँग्रेसच्या नेत्यावर कारवाई

Income tax department action against Congress leader in general elections

 

 

 

तेलंगणा राज्यात प्रचार शिगेला पोहोचला आहे. या विधानसभेच्या निवडणुकीत विजयी कामगिरी करण्यासाठी सर्वच पक्षांचे उमेदवार जोमाने प्रचार करत आहेत.

 

 

येथे भाजपा, काँग्रेस आणि भारत राष्ट्र समिती (बीआरएस) यांच्यात तिहेरी लढत होण्याची शक्यता आहे. असे असतानाच काँग्रेसचे उमेदवार पोंगुलेटी श्रीनिवास रेड्डी यांचे निवासस्थान आणि कार्यालयावर प्राप्तिकर विभागाने छापेमारी केली आहे. या कारवाईमुळे काँग्रेसने आक्रमक पवित्रा धारण केला असून बीआरएस आणि भाजपावर टीका केली आहे.

 

 

पोंगुलेटी श्रीनिवास रेड्डी यांना काँग्रेसने खम्मम जिल्ह्यातील पालेर या मतदारसंघातून तिकीट दिले आहे. ही निवडणूक जिंकण्यासाठी ते येथे पूर्ण ताकदीने प्रचार करत आहेत.

 

 

 

असे असतानाच प्राप्तिकर विभागाने गुरुवारी (९ नोव्हेंबर) रेड्डी यांचे निवासस्थान आणि कार्यालयात छापेमारी केली. पोंगुलेटी श्रीनिवास रेड्डी हे लवकरच आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

 

 

 

 

२ नोव्हेंबर रोजी उद्योगपती किचन्नागिरी लक्ष्मण रेड्डी यांचे कार्यालय तसेच निवासस्थानी प्राप्तिकर विभागाने कारवाई केली होती. त्यानंतर पोंगुलेटी श्रीनिवास रेड्डी यांनीदेखील प्राप्तिकर विभाग माझ्यावर कारवाई करण्याची शक्यता आहे, असे विधान केले आहे. असे असतानाच आता प्राप्तिकर विभागाने त्यांच्यावर प्रत्यक्ष कारवाई केली आहे.

 

 

 

या कारवाईनंतर त्यांनी बीआरएस आणि भाजपावर टीका केली. या पक्षांकडून काँग्रेसच्या नेत्यांना धमकावण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यासाठी हे दोन्ही पक्ष एकत्र आलेले आहेत.

 

 

 

मिळालेल्या माहितीनुसार प्राप्तिकर विभागाने पोंगुलेटी श्रीनिवास रेड्डी यांचे निवासस्थान आणि कार्यालयातू मोबाईल फोन आणि लॅपटॉप जप्त केले आहेत.

 

 

या कारवाईदरम्यान पोंगुलेटी रेड्डी यांच्या समर्थकांनी रेड्डी यांचे कार्यालय तसेच निवासस्थानी गर्दी केली होती. यावेळी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत प्राप्तिकर विभागाची कारवाई थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र या कारवाईदरम्यान तैनात करण्यात आलेल्या सुरक्षा रक्षकांनी या कार्यकर्त्यांना रोखले.

 

 

 

पोंगुलेटी रेड्डी यांनी २०१४ साली वायएसआर काँग्रेसच्या तिकिटावर खम्मम या लोकसभा मतदारसंघाची निवडणूक जिंकली होती. त्यांनी नंतर बीआरएस पक्षात प्रवेश केला.

 

 

मात्र २०१९ सालच्या लोकसभा निवडणुकीत बीआरएसने त्यांना तिकीट दिले नाही. तसेच पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे त्यांची पक्षातून हकालपट्टी केली. त्यानंतर या वर्षाच्या जुलै महिन्यात पोंगुलेटी श्रीनिवास रेड्डी तसेच जुपल्ली कृष्णा राव यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

 

 

 

प्राप्तिकर विभागाच्या या कारवाईनंतर तेलंगणा प्रदेश काँग्रेस समितीने आपली भूमिका स्पष्ट केली. प्रदेश काँग्रेसने बीआरएस तसेच तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्यावर टीका केली.

 

 

 

बीआरएस आणि भाजपाने हातमिळवणी केली आहे. ऐन निवडणुकीत अशा प्रकारच्या कारवाया करून आमच्या उमेदवारांना धमकी दिली जात आहे, अशी प्रतिक्रिया प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते जी. सतीश यांनी दिली.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *