पदभार स्वीकारताच नवे कुलगुरू ऍक्शन मोडमध्ये
The new vice chancellor is in action mode as soon as he takes charge

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांची अडचण झाली आहे. कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांनी पदभार स्वीकारताच कर्मचारी, अधिकारी यांची निश्चित वेळेनुसार उपस्थितीबाबत निर्देश दिले.
त्यामुळे पहिल्याच दिवशी अनेक कर्मचारी, अधिकारी वेळेपूर्वीच हजर होते. गुरुवारी अधिकाऱ्यांची बैठक घेत कामकाजाचा आढावा, विविध सूचना कुलगुरूंनी केल्याचे अधिकारी सूत्रांनी सांगितले.
कुलगुरू म्हणून डॉ. फुलारी यांनी बुधवारी पदभार स्वीकारला. बुधवारी सायंकाळी पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर त्यांनी कार्यालयीन उपस्थितीबाबत अधिकाऱ्यांना सूचना केल्या.
‘मी सकाळी दहाला कार्यालयात येणार आहे, तुम्ही सर्वही कार्यालयीन वेळेवरच कार्यालयात आले पाहिजेत,’ अशी ताकीद नव्या कुलगुरूंनी दिल्याचे सूत्रांनी सांगितले.
डॉ. फुलारी हे गुरुवारी सकाळी ९ वाजून ५० मिनिटाला प्रशासकीय इमारतीत दाखल झाल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. कुलगुरूंनी निर्देश दिल्याने अनेक अधिकारी,
कर्मचारी ९.५०, १० वाजेच्या दरम्यान उपस्थित होते. तर काही अधिकारी, कर्मचारी यानंतर दाखल झाले. आपल्याआधीच कुलगुरू कार्यालयात येऊन बसल्याचे काही कर्मचाऱ्यांची धांदल उडाल्याचे बघायला मिळाले. कुलगुरूंच्या सूचनांची चर्चा दिवसभर विद्यापीठात होती.
गुरुवारी सायंकाळी कुलगुरू डॉ. फुलारी यांनी विद्यापीठातील महत्त्वाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. व्यवस्थापन परिषदेच्या सभागृहात सुमारे तासभर ही बैठक चालली.
बैठकीत कुलगुरू डॉ. फुलारी यांनी अधिकाऱ्यांकडून कामाचा आढावा घेतला. तसेच पुढील काळात आपल्याला चांगले काम करायचे आहे,
त्यात सर्वांचे सहकार्य आवश्यक आहे. जे काम करतील त्यांचा गौरव तर काम नीट करणार नाहीत, त्यांच्यावर कारवाई करण्याचे संकेत दिल्याचे अधिकारी सूत्रांनी सांगितले.