नितीश कुमारांचे ठरले ;भाजपसोबत रविवारी घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ?
Nitish Kumar has decided to take the oath of Chief Ministership with BJP on Sunday?

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे भाजपसोबत जाणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ते रविवारी म्हणजे २८ तारखेला भाजपसोबत पदाची शपथ घेऊ शकतात.
नितीश कुमार भाजपसोबत जात सातव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. भाजपच्या दोन नेत्यांना उपमुख्यमंत्रीपदाची संधी मिळणार आहे.
इंडिया आघाडीसाठी हा मोठा धक्का आहे. कारण, दोन दिवसांपूर्वी तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी आणि पंजाबमधील आपचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी स्वतंत्रपणे लढणार असल्याचं जाहीर केलं आहे.
त्यामुळे आता नितीश कुमार भाजपसोबत गेले तर इंडिया आघाडीची मोठी पिछेहाट होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला मोठा फायदा होणार असल्याचं बोललं जात आहे.
जेडीयूने रविवारी असलेले आपले सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. रविवारी नितीश कुमार महाराणा प्रताप जयंती निमित्त एका सभेला संबोधित करणार होते. पण, हा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.
नितीश कुमार यांनी भाजपसोबत बोलणी सुरु केली होती. भाजप वरिष्ठांनी पुन्हा नितीश कुमार यांना सोबत घेण्यास मंजुरी दिल्याचं कळतंय. तसेच पुन्हा नितीश कुमार हेच मुख्यमंत्रीपदी राहणार आहेत.
इंडिया आघाडीचा प्रमुख चेहरा, विरोधकांची मोट बांधण्यासाठी महाराष्ट्रासह अनेक राज्यांचा दौरा करणारे सुशासन बाबू म्हणजे मुख्यमंत्री नीतीश कुमार पलटी मारणार का?, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
देशाच्या राजकारणात बिहारचे राजकारण नेहमी चर्चेत असते. आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बिहारच्या राजकारणाला उकळी आली आहे. इंडिया आघाडीच्या हृदयाचे ठोके वाढले आहेत.
इंडिया आघाडीचा प्रमुख चेहरा, विरोधकांची मोट बांधण्यासाठी महाराष्ट्रासह अनेक राज्यांचा दौरा करणारे सुशासन बाबू म्हणजे मुख्यमंत्री नीतीश कुमार पलटी मारणार का?,
अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. अद्याप पलटी मारणार की नाही हे अधीकृत स्पष्ट झाले नाही मात्र राजकारण निर्माण होण्याऱ्या शंका आणि त्यामागील पार्श्वभूमी समजून घेणे महत्वाचे आहे.
एकीकडे इंडिया आघाडीत खांद्याला खांदा असलेले जेडीयू-आरजेडीत मिठाचा खडा पडला आहे. यामुळं नितीश-लालू यांच्यातील मैत्रीत दुरावा निर्माण झाला.
त्यामुळे नितीश कुमारांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कारण त्यांनी अनेक वेळा तळ्यात-मळ्यात केले आहे. आपला पक्ष वाचवण्यासाठी आणि सत्तेसाठी नितीशजी पुन्हा एनडीएशी हातमिळवणी करणार का?, अशी राजकीय शंका निर्माण होत आहे. याला जबाबदार बिहारमधील सध्याचं राजकीय वातावरण.
नितीश कुमार भाजपसोबत जातील, अशी चर्चा सुरु आहे. मात्र त्यापूर्वी नितीश-लालूंमध्ये दुरावा का आला हे जाणून घेऊया. लालू प्रसाद यादव यांची मुलगी रोहिणी यादव यांनी दोन ट्वीट केले होते.
दोन्ही ट्वीटमध्ये त्यांनी नाव न घेता नितीश कुमार यांना टोला लगावला. ते समाजवादी असल्याचा दावा करताना पण त्यांची विचारधारा वाऱ्यासारखी बदलते. नाराजी व्यक्त करुन काय होणार, स्वत:च्या नियतमध्ये खोट आहे.
यापूर्वी मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी कर्पुरी ठाकूर यांचे कौतुक केले होते. कर्पुरी ठाकूर यांनी कधीही त्यांचे कुटुंब वाढवले नाही, आजकाल लोक त्यांचे कुटुंब वाढवतात, असे म्हटले होते.
आता इथे नितीशचे लक्ष्य कोठे होते याचा अंदाज बांधणे फारसे अवघड नाही. त्यांनी थेट कुटुंबवादातून लालूंच्या पक्षाला घेरले आहे, तर कर्पूरी ठाकूर यांच्या माध्यमातून त्यांची एनडीएशी जवळीकही वाढली आहे.
काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारने बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न देण्याची घोषणा केली होती. मुख्यमंत्री नितीश कुमार यांची अनेक दिवसांपासून ही मागणी होती,
यूपीए सरकारच्या काळातही त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. पण जो आदर तेव्हा दिला गेला नाही, तो लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकारने दिला.
कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न देण्याची घोषणा केल्यामुळे भाजला मागासवर्गीयांमध्ये बळ मिळण्याची शक्यता आहे. तर दुसरा फायदा म्हणजे भाजप जेडीयू पुन्हा जवळ आले आहेत.
कर्पूरी ठाकूर भारतरत्न देण्याची घोषणा झाल्यानंतर नितीश कुमार यांनी एक अभिनंदनाचे ट्वीट केले होते. त्यावरुन अनेक गोष्टी स्पष्ट झाल्या होत्या. त्यांनी नरेंद्र मोदी यांचे नाव न लिहिता आभार मानले होते. त्यामुळे नितीश कुमार पुन्हा पलटी मारणार का, अशी चर्चा रंगली.
बिहारमध्ये आता राजकीय वातावरण तापलं असेल पण नितीश कुमार यांचा इतिहास मोठा आहे. पक्ष वाचवणे, स्वत:चे अस्तित्व टिकून राहणे आणि सत्तेत राहणे हे त्यांचे एकमेव उद्दिष्ट असते. नितीश कुमार यांचा इतिहास परिस्थितीनुसार बदलणारा आहे.
ज्यांच्याशी ते संबंध तोडतात त्यांच्याशी परत युती करतात. लालू यादव यांच्याशी करार असो की भाजपशी युती, सत्तेत राहण्यासाठी ते सतत भूमिका बदलत असतात.
भाजपने नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषित केल्यानंतर नितीश कुमार यांनी एनडीए सोडली होती. यानंतर त्यांच्या स्थानिक महाआघाडीवर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर त्यांनी लालू प्रसाद यादव यांची साथ सोडली.
त्यानंतर भाजपने दबावाचे राजकारण केले त्यानंतर नितीश यांनी पुन्हा पलटी मारली. त्यानंतर पुन्हा भाजपची साथ सोडली अन् आरजेडीचा हात पकडला.
इंडिया आघाडीच्या माध्यमातून देशात विरोधकांना जोडण्याचा प्रयत्न केला. मात्र आता पुन्हा नितीश कुमार पलटी मारणार असल्याची चर्चा आहे.
मात्र आता नितीश कुमार यांच्यासाठी पलटी मारणे फार सोपे नाही. लालू प्रसाद यादव जोरदार तयारीत आहेत. त्यांनी शांत राहून सर्व डाव साधले आहेत. सभापती देखील त्यांच्याच पक्षाचा असल्यामुळे त्यांना मदत मिळू शकते.
महाआघाडी सध्या बहुमताच्या आकड्यापासून केवळ आठ जागा दूर आहे, अशा स्थितीत लालूंनी भाजपचा आदर्श घेऊन मोठी खेळी केली, तर यावेळी नितीश कुठेच उरणार नाहीत.
2020 मध्ये निवडून आलेल्या 243 सदस्यांच्या बिहार विधानसभेत आरजेडी 79 जागांसह सर्वात मोठा पक्ष आहे आणि भाजप 78 आमदारांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे.
नितीश कुमार यांचा जेडीयू 45 जागांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. नितीश यांनी 2020 ची बिहार विधानसभा निवडणूक भाजपसोबत युती करून लढवली होती.
युतीचे कनिष्ठ भागीदार असूनही, भाजपसोबत झालेल्या निवडणूकपूर्व करारानुसार नितीश बिहारचे मुख्यमंत्री बनले.
मात्र, दोन वर्षांत नितीश यांनी भाजपला धूळ चारली आणि सरकार स्थापन करण्यासाठी आरजेडी,
काँग्रेस आणि डाव्या पक्षांसोबत हातमिळवणी केली . या युतीमध्येही, नितीश हे कनिष्ठ भागीदार होते परंतु त्यांनी मुख्यमंत्रिपद राखले, ही त्यांच्या राजकीय कारकिर्दीची एक चाल होती.
नितीश यांनी बिहारचे मुख्यमंत्री राहण्यासाठी अनेकदा बाजू बदलली आहे. आता, नितीश यांच्या इंडिया आघाडीतून बाहेर पडण्याच्या चर्चेवर आणखी एक कारण असू शकतं.
लालूप्रसाद यादव यांचा मुलगा तेजस्वी यादव मुख्यमंत्री पदासाठी चर्चेत आहे. त्यामुळे नितीश कुमार यांना झटका बसू शकतो. त्यामुळे ते भाजपसोबत जवळीक वाढवत असल्याची चर्चा आहे.