मुंबई पोलिसांची न्यायालयात धक्कादायक माहिती; निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणाच्या हत्येचा कट?
Shocking Information of Mumbai Police in Court; In the wake of the election, who's murder plot?
राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे नेते बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी दोघांना अटक केली असून आज त्यांना सुटीकालीन न्यायालयात हजर करण्यात आले होते.
मुंबई पोलिसांनी त्यांच्या कोठडीची मागणी केली होती. त्यानुसार त्यांना २१ ऑक्टोबरपर्यंत मुंबई गुन्हे शाखेची कोठडी सुनावण्यात आली आहे.
दरम्यान, मुंबई पोलिसांनी न्यायालयात धक्कादायक माहिती दिली आहे. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळ्या झाडणाऱ्या तिघांनी लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या सदस्याची हरियाणातील तुरुंगात भेट घेतली होती. हे तिघेही त्या तुरुंगात विविध गुन्ह्यांसाठी शिक्षा भोगत होते.
शिवकुमार गौतम आणि मोहम्मद झीशान अख्तर हे दोघेही या प्रकरणातील संशयित आरोपी असून पोलीस त्यांच्य मागावर आहेत. गौतम हा वांद्रे येथील तीन नेमबाजांपैकी एक होता, तर अख्तरला सिद्दीकीच्या हत्येचा सुपारी मिळाली होती,
असं समजते. त्यांची १४ दिवसांची कोठडी मागताना, पोलिसांनी न्यायालयाला कळवले की योग्य कट रचून ही हत्या करण्यात आली आहे.
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका जवळ आल्याने आरोपींनी इतर कोणाचा खून करण्याचा कट आखला होता की नाही हे ठरवण्याची गरज आहे.
गुन्हा करण्यापूर्वी हे आरोपी पुणे आणि मुंबई येथे राहिले आहेत. हत्या करण्यासाठी वापरण्यात आलेल शस्त्र आणि वाहन कोणी पुरवले याचा तपास करावा लागेल, असं सरकारी वकील गौतम गायकवाड म्हणाले.
या हत्येमागील कारण आणि या गुन्ह्यात परदेशातील टोळीचा सहभाग आहे का, याबाबत माहिती मिळू शकलेली नाही, असे गायकवाड यांनी सांगितले. “त्यांनी सिद्दीकी यांच्यावर योग्य निशाणा साधला होता.
त्यामुळे त्यांना काही प्रशिक्षण देण्यात आले होते का आणि संपूर्ण ऑपरेशनसाठी कोणी निधी दिला होता, याचाही तपास करावा लागेल”, असं सरकारी वकील पुढे म्हणाले.
बचाव पक्षाच्या वकिलांनी मात्र हे आरोप फेटाळून लावले आणि असा दावा केला की अटक केलेल्या दोघांनी गुन्हा केल्याचे सिद्ध करण्यासाठी पोलिसांकडे कोणतेही पुरावे नाहीत.
“मृत व्यक्ती प्रसिद्ध व्यक्ती आहे आणि त्यांचे अनेक शत्रू असू शकतात. त्यामुळे पोलिसांनी त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवले असण्याची शक्यता आहे”, असे सिद्धार्थ अग्रवाल यांनी सांगितले.
पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन आरोपी कुर्ल्यात महिन्याभरापासून १४ हजार रुपये भाड्याने राहत होते. अधिकाऱ्यांनी सांगितलं की चार आरोपींना अडीच ते तीन लाखांचं कंत्राट देण्यात आलं होतं. हे पैसे ते आपसांत वाटून घेणार होते.
पोलीस म्हणाले, गुरमेल सिंह, धर्मराज कश्यप आणि गौतम या तीन कथित नेमबाजांची यापूर्वी तुरुंगात भेट झाली होती. हे तिघेही हरियाणाच्या तुरुंगात बिश्नोई टोळीच्या सदस्याशी संपर्कात आले होते.
तिथेच त्यांना हे कंत्राट देण्यात आले होते. दोन फरार आरोपींच्या शोधासाठी पुणे, हरियाणा, दिल्ली आणि उज्जैन येथे पथके रवाना झाली आहेत.