२४ तासांत गारपीटीचा इशारा ;हवामान विभागाचा अंदाज
24-hour hail warning; Meteorological department forecast

भारतीय हवामान खात्याने वर्तवलेला अंदाज तंतोतंत खरा ठरला. राजधानी दिल्ली, पंजाब, हरियाणासह उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये गुरुवारी (१ फेब्रुवारी) मुसळधार पाऊस झाला.
तर काही ठिकाणी जोरदार गारपीट देखील झाली. पावसामुळे हवेतील गारवा वाढल्याने थंडीची तीव्रता देखील वाढली. या अवकाळी पावसात शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे.
पंजाब आणि हरियाणामध्ये काढणीला आलेला गहू गारपीटीमुळे पूर्णत: आडवा झाल्याने बळीराजा संकटात सापडला आहे.
दरम्यान, येत्या २४ तासांत अवकाळी पावसाचा जोर आणखीच वाढणार, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे बळीराजाच्या चिंतेत आणखीच वाढ झाली आहे.
आयएमडीने जारी केलेल्या अंदाजानुसार, पुढील २४ तासांत दिल्लीसह एनसीआर, उत्तर प्रदेशात मुसळधार पाऊस होऊ शकतो.
त्याचबरोबर पंजाब आणि हरिणायामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार गारपीट होऊ शकते. याशिवाय जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये पावसासोबत बर्फवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
दिल्लीत गेल्या दोन दिवसांपासून अधून-मधून पावसाच्या सरी कोसळत आहेत. आयएमडीच्या माहितीनुसार, बुधवार आणि गुरुवारी दिल्ली २७.१ मिमी पाऊस झाला.
या पावसामुळे दिल्लीतील प्रदूषणात घट झाली आहे. हवामान खात्याने दिल्लीत आजही मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
जम्मू काश्मीरमध्ये सलग दोन दिवसांपासून हिमवृष्टी सुरू आहे. गुरुवारी देखील श्रीनगर, कटरा, भैरो व्हॅलीसह जम्मू-काश्मीरच्या अनेक भागात बर्फवृष्टी झाली.
यामुळे रस्ते दिसेनासे झाले असून जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आला आहे. त्यामुळे काश्मीरमधील अनेक जिल्ह्यांचा संपर्क तुटला आहे.