संसदेत इंग्रजीतून प्रश्नाने, नारायण राणेंची झाली फजिती
Narayan Rane was embarrassed by a question in English in Parliament

नरेंद्र मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील संसदेचे अखेरचे अधिवेशन सुरू आहे. राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला काल लोकसभेत नरेंद्र मोदी
यांनी उत्तर दिलं. त्यानंतर पुढच्या काही तासातच राज्यसभेत झालेल्या चर्चेदरम्यान केंद्रीय मंत्री नारायण राणे चांगलेच अडचणीत सापडले.
राज्यसभेतील भाजपचे खासदार कार्तिकेय शर्मा यांनी सूक्ष्म लघू आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांना त्यांच्या खात्यासंदर्भात प्रश्न विचारला.
एमएसएमई क्षेत्रातील कामगार आणि कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी सरकारने कोणती पावले उचलली आहेत? असा इंग्रजीतून प्रश्न विचारल्याने नारायण राणे गडबडले. उत्तर देता देता त्यांची त्रेधा तिरपिट उडाली.
भाजप खासदार कार्तिकेय शर्मा सुरूवातीला काय प्रश्न विचारला आहे, हे नारायण राणे यांना कळलंच नाही. त्यामुळे एमएसएमईमध्ये सरकार निर्यात तशा पद्धतीने वाढवणार अशा आशयाचं उत्तर त्यांनी दिलं.
एमएसएमई क्षेत्रात निर्यात वाढविण्यासाठी सरकारकडून ‘मेन इन इंडिया योजने’च्या अंतर्गत विविध कार्यक्रम आखलेले आहेत,
असं उत्तर नारायण राणे देत असतानाच, प्रश्न एक आणि उत्तर दुसरंच असं सुरू असल्याचं उपस्थित खासदारांच्या लक्षात आलं.
त्यावेळी राज्यसभेत काहीशी कुजबूज आणि गोंधळही झाला. त्यानंतर राज्यसभेचे उपाध्यक्ष, पीठासीन अधिकारी हरिवंश नारायण सिंह यांनी कार्तिकेय यांनी नेमका काय प्रश्न विचारला, हे हिंदीतून सांगितलं.
त्यावर गोंधळ घालत असलेल्या खासदारांना शांत करताना तुम्ही ऐका.. तुम्ही ऐकून घ्या, अशी विनंती नारायण राणे यांनी केली. गोंधळ पाहून ”क्या… काय केलं…” असंही राणे कुजबुजले… कारखाने सुरू झाले नाहीत,
तर कामगारांचे प्रश्न सुटतील का? असं तावातावाने राणे बोलत राहिले. त्यांच्या उत्तराने समाधान न झाल्याने खासदारही आक्षेप घेत होते.
हे ओळखून त्यांच्या मदतीला राज्यसभेचे उपाध्यक्ष हरिवंश नारायण सिंह धावले. संबंधित खासदार महोदयांना बोलावून एमएसएमई क्षेत्रातील
कामगार आणि कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी सरकार काय पावलं उचलतंय, हे तुम्ही त्यांना सांगा, असे निर्देश हरिवंश नारायण सिंह यांनी दिले.