बिहारमध्ये नितीश कुमारांचे 4 आमदार गायब ;उद्या बहुमत चाचणी
4 MLAs of Nitish Kumar missing in Bihar; majority test tomorrow

बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी राजकीय हालचाल निर्माण झाली आहे. सोमवारी बिहारच्या विधानभवनात अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार असून यात बहुमत चाचणी घेतली जाणार आहे.
त्यामुळे आरजेडी आणि जेडीयूच्या प्रमुख नेत्यांमध्ये धाकधूक निर्माण झाली आहे. दोन्ही पक्ष आमदार आपल्यासोबत असल्याचा दावा करत आहेत. पण, सोमवारीच याबाबतचे खरे चित्र स्पष्ट होईल.
संयुक्त जनता दलाने विधिमंडळ नेत्यांची बैठक बोलावली आहे, तर राष्ट्रीय जनता दलाचे ७९ आमदार तेजस्वी यादव यांच्या घरी थांबले आहेत.
त्यांची सर्व सोय तेथे केली जात आहे. दुसरीकडे काँग्रेसचे १९ आमदार हैद्राबादमध्ये आहेत. राज्यात आल्यानंतर त्यांना सुद्धा तेजस्वींच्या घरी थांबण्यास सांगण्यात आलं आहे.
आरजेडी आपल्या पद्धतीने जोरदार फिल्डिंग लावण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे उद्या राज्यात ‘खेला’ होणार असा दावा केला जात आहे.
जेडीयूच्या विधिमंडळ नेत्यांच्या बैठकीमध्ये सर्व ४५ आमदार पोहोचलेले नाहीत. यातील चार आमदार बैठकीला उपस्थित नाहीत. शिवाय त्यांना फोन देखील लागत नाहीये.
त्यामुळे विविध तर्कवितर्क लावले जात आहेत. या आमदारांमध्ये बीमा भारती, सुदर्शन, दिलीप राय आणि रिंकू सिंग यांचा समावेश आहे.
याशिवाय आमदार डॉ. संजीव हे देखील बैठकीला आलेले नाहीत. पण, सध्या ते पाटण्याच्या बाहेर असून यासंदर्भात त्यांनी पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांना कळवलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी जेडीयू आमदारांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत. उद्या बहुमत चाचणी असल्याने सर्व आमदारांना वेळेवर उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे.
आमदारांनी एकजूटपणा दाखवावा. आकडे आपल्या बाजूने आहेत. त्यामुळे आपण बहुमत चाचणी सहज जिंकू यात शंका नाही असं ते आमदारांना म्हणाले आहेत.
जीतनराम मांझी यांच्या नेतृत्त्वात HAM च्या आमदारांची बैठक झाली आहे. त्यांनी आपण राष्ट्रीय लोकशाही आघाडीसोबत असल्याचं म्हणाले आहेत. त्यामुळे ते विधिमंडळात भाजपच्या बाजूने असतील.
दरम्यान, उद्याच्या बहुमत चाचणीकडे देशाचं लक्ष असणार आहे. क्रॉस वोटिंग होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आमदारांना एकजूट ठेवलं जात आहे.