प्रकाश आंबेडकरांचा गौप्यस्फोट ;मला राष्ट्रपतीपदाची ऑफर
Prakash Ambedkar's secret blast; I was offered the post of President

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याआधी मला राष्ट्रपती पदासाठी विचारणा झाली होती, असा गौप्यस्फोट वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
महाविकास आघाडीसोबत लोकसभा निवडणुकीची तयारी करताना, जागावाटपाच्या चर्चा सुरू असताना आंबेडकरांनी मोठा दावा केला आहे.
भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघासोबत वैचारिक मतभेद असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. ते लोकशाही या मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.
द्रौपदी मुर्मू यांच्या आधी राष्ट्रपती पदासाठी मला विचारणा झाली होती. तुम्ही लवकरच वयाची सत्तरी ओलांडणार नाहीत. त्यामुळे तुम्हाला राष्ट्रपती व्हायला आवडेल का, असं भाजपकडून मला विचारण्यात आलं होतं.
त्यावर माझ्याकडून अजूनही १० वर्षे शिल्लक आहेत असं सांगितलं. मला तुम्ही राजकारणातून बाजूला करण्याचा प्रयत्न करताय का, असा प्रश्न मी त्यांना विचारला.
२०२४ मध्ये सर्व पक्षांनी चांगली कामगिरी केल्यास चित्र वेगळं असू शकतं. मी तुमच्या विरोधात आहे हे लक्षात घ्या, असं मी राष्ट्रपतीपदासाठी विचारणा करणाऱ्यांना सांगितलं, असं आंबेडकर म्हणाले.
तुम्हाला राष्ट्रपतीपदाची ऑफर नेमकी कोणी दिली होती, कोणत्या स्तरावर याबद्दल बोलणी सुरू होती, असे प्रश्न आंबेडकरांना विचारण्यात आले.
त्यावर हा प्रश्न तुम्ही भाजपवाल्यांना विचारा. मी माझा सोर्स सांगणार नाही. ज्या रस्त्यानं जायचं नाही, त्याचा विचार आम्ही करत नाही. काँग्रेस, राष्ट्रवादीनं
आमच्या विरोधात कितीही भूमिका घेतली, चळवळ मोडून काढण्यापर्यंत जरी ते पोहोचले, तरीही आम्ही भाजपसोबत हातमिळवणी केली नाही, असं आंबेडकरांनी सांगितलं.
सध्याची राजकीय परिस्थिती पाहिल्यास राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपला आव्हान देण्याची क्षमता केवळ फुले आंबेडकरी चळवळीमध्ये आहे. सध्याची परिस्थिती तरी अशीच आहे. त्या चळवळीचं प्रतिनिधीत्व आमचा गट करतो, असं आंबेडकर म्हणाले.