साडेसहा लाखांची लाच घेतांना ग्रामसेवक ताब्यात
Gram sevak arrested while accepting bribe of 6.5 lakhs
गावाच्या विकासकामांचे बिल अदा करण्यासाठी अक्कलकुवा पंचायत समितींतर्गत असलेल्या ग्रामसेवकाने लाचेची मागणी केली.
६ लाख ४७ हजार रुपयांची लाच मनोज पावरा (रा. दामोदरनगर, तळोदा) या ग्रामसेवकास नंदुरबार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडून गुन्हा दाखल केला.
सिंदुरी (ता. अक्कलकुवा) येथे महिला सरपंच आहे. दरम्यान ग्रामपंचायतीवर शासनाचे प्रशासक कार्यरत होते. या काळात ग्रामपंचायत सिंदुरी अंतर्गत मंजूर रस्ता काँक्रिटीकरण, पेव्हर ब्लॉक बसविणे
अशी विविध आठ प्रकारची मंजूर विकासकामे तक्रारदार व त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी पूर्ण केली आहेत. सदरची कामे पूर्ण झाल्यावर कामांसाठीचे ३२ लाख ३४ हजार रुपये ग्रामपंचायत सिंदुरीच्या बँक खात्यात शासनाकडून आले आहे.
मात्र, या कामांच्या बिलाचे धनादेश देण्याच्या मोबदल्यात आरोपी ग्रामसेवक व खासगी व्यक्ती यांनी बिलाच्या रकमेच्या २० टक्के रक्कमेची मागणी केली.
ग्रामसेवकाने सहा लाख ४७ हजार रुपये लाचेची मागणी करीत सदर रक्कम पंच व साक्षीदारांसमक्ष स्वीकारली. याचवेळी एसीबीच्या पथकाने ग्रामसेवकास ताब्यात घेतले आहे.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे सापळा अधिकारी पोलिस उपअधीक्षक राकेश चौधरी यांच्या पथकाने केली. ग्रामसेवकास
७ फेब्रुवारीला तळोदा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.