लोकसभा निवडणुकीच्या हालचाली ;सर्व मतदारसंघांत आयबी, सीआयडी झाली सक्रिय
Lok Sabha election activities; IB, SID became active in all constituencies
देशात सध्या निवडणुकीचा काळ जवळ येत आहे. एकापाठोपाठ आता विविध निवडणूक होणार आहेत. लोकसभा, विधानसभा व त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक आता होणार आहे.
निवडणुकीसाठी जसे राजकीय पक्ष सक्रिय झाले आहेत, अगदी त्याच पद्धतीने महाराष्ट्रातील गुप्तचर यंत्रणांनीही विविध प्रकारची माहिती गोळा करण्यास सुरुवात केली आहे.
लोकसभा निवडणूक कोणत्याही क्षणी जाहीर होऊ शकते. राज्यसभा निवडणूक आटोपताच लोकसभेचे बिगुल वाजेल, असे सांगण्यात येत आहे.
निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रात वेगवेगळ्या नेत्यांच्या, वक्त्यांच्या सभा, संमेलनांचे सत्र आता सुरू झाले आहे. राज्यातील सर्वच राजकीय आयोजकांवर, आयोजनांवर सध्या केंद्राची गुप्तचर यंत्रणा आयबी
आणि महाराष्ट्र पोलिसांची गुप्तचर यंत्रणा एसआयडी नजर ठेवून आहे. कोणत्या नेत्याच्या सभेत कोण प्रक्षोभक बोलले. कोणती घोषणाबाजी झाली. सभेनंतर कोणता समाजवर्ग प्रभावित झाला.
कोणते प्रलोभन मतदारांना दिले गेले. अशा सर्वच बाबींची माहिती संकलित केली जात आहे. आयबी आणि एसआयडीच्या अधिकाऱ्यांव्यतिरिक्त प्रत्येक जिल्ह्यातील पोलिस दलाची स्वतंत्र गुप्तचर यंत्रणा असते.
पोलिस स्टेशननिहाय हे कर्मचारी कार्यरत असतात. या कर्मचाऱ्यांनीदेखील आता माहिती संकलनाचे काम सुरू केले आहे.
महाराष्ट्रात मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, नाशिक, कोकण अशा ठिकाणी आयबी आणि एसआडीचे कार्यालय आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्थेसोबतच सर्वंकष माहिती या विभागांकडून गोळा केली जात आहे.
प्रत्येक लोकसभा मतदारसंघातील संभाव्य उमेदवार कोण असू शकतात, याचली तपशिलवार माहिती या विभागाने तयार केली आहे.
संबंधित उमेदवारांचे बलाबल, लोकप्रियता आणि उमेदवारी मिळाल्यास विजयी होण्याची शक्यता याचा लेखाजोखाही आयबी आणि एसआयडीकडे तयार आहे.
संकलित केलेल्या माहितीच्या आधारे आयबी केंद्रस्तरावरील वरिष्ठांना तर एसआयडी राज्यस्तरावरील वरिष्ठांना वेळोवेळी ‘इनपुट’ पुरवित असते.
आयबी आणि एसआयडीकडून माहिती संकलनाचा प्रकार प्रथमच केला जात आहे असे नाही. वर्षानुवर्षांपासून हे काम सुरू आहे. केंद्रात व राज्यात कोणाचे सरकार सत्तेवर येऊ शकते.
कोणत्या मुद्द्यांमुळे कायदा व सुव्यवस्था बिघडू शकते याअनुषंगाने ही माहिती दोन्ही यंत्रणा गोळा करीत असतात. याच माहितीच्या आधारावर संबंधित व्हीव्हीआयपींच्या पोलिस सुरक्षेत व दौऱ्यांमध्ये वेळोवेळी बदली केली जाते.
निवडणूक असो की अन्य कोणतेही आयोजन आयबी आणि एसआयडीच्या गुप्तचरांनी संकलित केलेली माहिती सहसा चुकत नाही, असे मानले जाते.
निवडणूक काळात तर जितके महत्त्व ‘अॅक्झिट पोल’ला असते तितकेच महत्त्व या दोन्ही यंत्रणांच्या गोपनीय अहवालालाही दिले जाते. सध्या या दोन्ही यंत्रणा महाराष्ट्रातील प्रत्येक माहितीची जुळवाजुळव करीत आहे.