५०० रुपयांची लाच घेताना RTO अधिकारी रंगेहात अटक
RTO officer arrested red-handed while taking Rs 500 bribe
लाखाच्या घरात असताना ही ट्रक चालकाकडून ५०० रूपयाची लाच घेताना आरटीओ विभागातील अधिकारी अन्य एका साथीदारासह लाचेच्या जाळ्यात अडकला.
नांदेड जिल्हातील देगलूर चेक पोस्ट येथे अमरावती जिल्ह्यातील लाच लुचपत अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली. झाडाझडती घेतली असता चेक पोस्ट कार्यालयात ६३ हजार ८२० रुपये आढळून आले.
अमोल धर्मा खैरनर असे नाव असून आरटीओ विभागात वाहन निरीक्षक पदी कार्यरत आहेत. प्रत्येक ट्रक चालकाकडून ५०० रुपये ते दोन हजार रुपये अधिकारी घेत होते अशी माहिती आहे. या कारवाईने एकच खळबळ उडाली आहे.
महाराष्ट्र आणि तेलगंणा राज्याच्या सीमेवर असलेल्या नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथे आरटीओ विभागाच चेक पोस्ट कार्यान्वित आहे.
दररोज शेकडोच्या संख्येने वाहणाची रेलचेल असते. महाराष्ट्र आणि तेलगंणा राज्यातुन ट्रकची ये-जा मोठ्या प्रमाणात असते.
या मार्गावरून दररोज किती ट्रक जातात, ट्रक मध्ये किती माल आहे याचे वजन करून नोंदी करण्याचे काम चेक पोस्टमधील आरटीओच्या
अधिकाऱ्यांकडून केले जाते. रजिस्टरवर नोंद करणे बंधनकारक असते. दर आठवड्याला वेगवेगळ्या अधिकाऱ्यांची ड्युटी लावली जाते.
अमोल धर्मा खैरनर या वाहन निरीक्षकाची २० सप्टेंबरपासून चेक पोस्टवर ड्युटी होती. ड्युटी दरम्यान खैरनर हा खाजगी व्यक्ती गोपाळ इंगळे याच्या मार्फत ट्रक चालकाकडून पैसे वसूल करायचा.
बुधवारी एका ट्रक चालकाकडून ५०० रूपयाची लाच घेताना लाच लुचपत विभागाच्या पथकाने आरटीओ अधिकारी आणि अन्य एका व्यक्तीला अटक केली.
विशेष म्हणजे अमरावतीच्या लाच लुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली. कार्यालयाची झडती घेतली असता ट्रक चालकांकडून वसुली केलेले ६३ हजार ८२० रुपये देखील आढळून आले.
या प्रकरणी देगलूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान न्यायालयाने आरटीओ अधिकाऱ्यासह अन्य एकाला ३० सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
देगलूर येथील चेक पोस्ट कार्यालय नेहमी चर्चेत असते. येथील आरटीओ अधिकारी चेकिंगच्या नावाखाली ट्रक चालकांची लूट करत असतात असा आरोप ट्रक चालकाकडून केला जात आहे.
तपासणी न करता ट्रक सोडण्यासाठी अधिकारी एका ट्रक चालकाकडून ५०० ते २००० रुपये घेतात. दिवसाला शेकडोच्या संख्येने ट्रकची या चेक पोस्ट वरून ये-जा राहत असते.
पैसे न दिल्यास अधिकाऱ्यांकडून अडवणूक केली जाते. दरम्यान या प्रकरणी सखोल चौकशी झाल्यास आरटीओच्या अनेक अधिकाऱ्यांची कारनामे समोर येण्याची शक्यता आहे.