अमित शहा कॅबिनेट मंत्र्यांवर भयंकर संतापले; तिघां मंत्र्यांना ४० मिनिटं उभे केले
Amit Shah furious with cabinet ministers; The three ministers were made to stand for 40 minutes
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मंगळवारी राजस्थानच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला. त्यासाठी बिकानेर, उदयपूर आणि जयपूरमध्ये भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या.
यावेळी अमित शहांचा आक्रमक अवतार पाहायला मिळाला. ते पाहून तीन कॅबिनेट मंत्री आणि भाजप पदाधिकाऱ्यांना धक्काच बसला.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शहांनी कॅबिनेट मंत्री गजेंद्र सिंह खिंवसर, सुमित गोदारा आणि अविनाश गहलोत यांना सर्वांसमोर सुनावलं. त्यांना जवळपास ४० मिनिटं स्टेजसमोर उभं ठेवलं.
तुम्हा दिलेल्या कामाचा अहवाल ठरलेल्या वेळेत मला द्या, असं म्हणत शहांनी तीन मंत्र्यांना डेडलाईन दिली. शहांच्या आक्रमक पवित्र्याची चर्चा भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये बराच वेळ होती.
बिकानेरच्या पार्क पॅराडाईज हॉटेलमध्ये भाजप पदाधिकाऱ्यांची क्लस्टर बैठक झाली. यावेळी शहांनी आरोग्यमंत्री गजेंद्र सिंह यांना बिकानेर लोकसभा, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री सुमित गोदारा यांना
हनुमानगढ श्रीगंगानगर, सामाजिक न्यायमंत्री अविनाश गहलोत यांना चुरु लोकसभा मतदारसंघातील लोकसभा निवडणुकीच्या तयारीबद्दल प्रश्न विचारले.
तिन्ही मंत्र्यांना समाधानकारक उत्तरं देता आली नाहीत. त्यामुळे शहा त्यांच्यावर भडकले. मंत्री आहात म्हणून या कामासाठी वेळ देता येत नाहीए का,
असा प्रश्न शहांनी विचारला. शहांचा राग पाहून बैठकीत सन्नाटा पसरला. उपस्थित असलेल्या नेत्यांना तोंडातून एक शब्द काढला नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी जम्मूला गेले आहेत. मी राजस्थानला आलो आहे. आम्ही निवडणुकीच्या तयारीला लागलो आहोत. तुम्ही मागे का? निवडणुकीची तयारी अद्याप सुरू का केली नाही?, अशी प्रश्नांची सरबत्ती शहांनी केली.
अमित शहांनी खिंवसर, गोदारा आणि गहलोत यांना लोकसभा निवडणुकीच्या तयारीबद्दल प्रश्न विचारले. त्यांनी उत्तरं दिली. पण शहांचं समाधान झालं नाही.
त्यामुळे नाराज झालेल्या शहांनी तिन्ही मंत्र्यांचे कान टोचले. बैठक संपेपर्यंत त्यांना स्टेजसमोर उभं केलं. तीन मंत्री जवळपास ४० मिनिटं स्टेजवर उभे होते. २९ फेब्रुवारीपर्यंत मला सगळे अहवाल द्या, अशी सूचना देऊन शहा बैठक संपवून निघून गेले.