हिवाळ्यातच मराठवाड्यावर पाणी टंचाईचे सावट
Marathwada faces water shortage in winter itself
चार जिल्हे अवलंबून असलेल्या जायकवाडी धरणात ४५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. रब्बी हंगामासाठी चार आवर्तने सोडण्याची मागणी आहे.
मात्र, उर्ध्व भागातील धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय न्यायप्रविष्ट असल्यामुळे जायकवाडीचा तिढा सुटलेला नाही. नांदेड आणि हिंगोली जिल्ह्याचा अपवाद वगळता इतर सहा जिल्ह्यातील मध्यम आणि लघु प्रकल्पांची स्थिती चिंताजनक आहे.
मराठवाड्यातील ११ मोठ्या प्रकल्पातील पाणीसाठा कमी झाला आहे. जायकवाडी धरणात ४५ टक्के पाणीसाठा आहे. येलदरी ६०, सिद्धेश्वर ९६, माजलगाव ८, मांजरा २७, उर्ध्व पेनगंगा ८३, निम्न तेरणा १९, निम्न मनार ७०, विष्णुपुरी ८७,
निम्न दुधना २४ असा धरणनिहाय पाणीसाठा आहे. सिना कोळेगाव धरण कोरडे आहे. विभागातील ७५ मध्यम प्रकल्पात अवघा २९ टक्के पाणीसाठा आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील १६ मध्यम प्रकल्पात २४ टक्के,
जालना जिल्ह्यातील सात मध्यम प्रकल्पात १८ टक्के, बीड जिल्ह्यातील १६ प्रकल्पात ४० टक्के, लातूर जिल्ह्यातील आठ प्रकल्पात २५ टक्के,
धाराशिव जिल्ह्यातील १७ प्रकल्पात १४ टक्के, नांदेड जिल्ह्यातील नऊ प्रकल्पात ५८ टक्के, परभणी जिल्ह्यातील दोन प्रकल्पात २१ टक्के पाणीसाठा आहे.
विभागातील ७५० लघु प्रकल्पांची स्थिती चिंताजनक असून ३० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. जालना जिल्ह्यातील ५७ लघु प्रकल्पात फक्त सात टक्के पाणीसाठा आहे.
हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यातील लघु प्रकल्पात अनुक्रमे ७६ आणि ९२ टक्के पाणीसाठा आहे. या दोन जिल्ह्यांचा अपवाद वगळता इतर जिल्ह्यातील लघु प्रकल्पांनी तळ गाठला आहे.
मध्यम आणि लघु प्रकल्पांवर परिसरातील गावे अवलंबून आहेत. सिंचन आणि पिण्याच्या पाण्यासाठी प्रकल्पांचा उपयोग होतो. पावसाळ्यात अडीच महिने पावसाने उघडीप दिल्यामुळे कोणत्याही प्रकल्पात पाणीसाठा झाला नाही.
जिल्ह्यात काही भागात टँकर सुरू आहेत. फळबागांच्या सिंचनासाठी पुरेसे पाणी नसल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. डिसेंबरनंतर पाण्याच्या टँकरची संख्या जास्त वाढणार आहे. पाच जिल्ह्यात पाणीसाठ्याची स्थिती गंभीर आहे.
दरम्यान, जायकवाडी धरणात नगर व नाशिक जिल्ह्यातील धरणातून पाणी सोडण्याच्या निर्णयाचा तिढा सुटलेला नाही. नाशिक जिल्ह्यातून पुन्हा याचिका दाखल करण्यात आली आहे. संबंधित प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे पाणी सोडण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी होणे कठीण झाले आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील १६ मध्यम प्रकल्पातही कमी पाणीसाठा आहे. लहुकी, कोल्ही, बोरदहेगाव ही धरणे पूर्ण कोरडी आहेत. सुखना धरणात २५ टक्के पाणीसाठा आहे.
टेंभापुरी ३५, ढेकू ६, नारंगी १९, वाकोद १२, गिरजा १९, अंबाडी ६, गडदगड ७, पूर्णा नेवपूर ४३, अंजना पळशी १७, शिवना टाकळी ८, खेळणा ७ आणि अजिंठा अंधारी
मध्यम प्रकल्पात फक्त तीन टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. पाणीपातळी झपाट्याने कमी होत असून पाणी टंचाई तीव्र होण्याची शक्यता आहे.