नवीन सर्व्हे मध्ये शिंदें -अजित पवार ,किती जागा जिंकणार?आकडा आला समोर
In the new survey, how many seats will Shinde - Ajit Pawar win?

लोकसभा निवडणूक जवळ आली आहे. पण महायुती आणि महाविकास आघाडीत जागावाटपाचा पेच कायम आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ईटीजी रिसर्चनं केलेल्या सर्व्हेक्षणातून अंदाज वर्तवण्यात आला आहे.
राज्यात भाजपला सर्वाधिक जागा मिळतील. केंद्रात आणि राज्यात सत्तेत असलेला भाजप ४८ पैकी २७ ते ३१ जागा जिंकू शकेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
राज्यात महायुतीला सर्वाधिक जागा मिळतील असा अंदाज आहे. ईटीजीच्या सर्व्हेनुसार, राज्यात भाजपला २७ ते ३१, शिंदेंच्या शिवसेनेला ४ ते ६, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला १ ते ३ जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला ७ ते ९, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला १ ते ३, काँग्रेसला ० ते १ जागा मिळू शकतात. तर अन्य पक्षांच्या खात्यात ० ते १ जागा जाऊ शकते.
ईटीजीची आकडेवारी पाहता भाजपला फायदा होताना दिसत आहे. मागील निवडणुकीत भाजपनं २३ जागांवर यश मिळवलं होतं. आता त्यांच्या जागांमध्ये वाढ होताना दिसत आहे.
भाजपला ४ ते ८ जागांचा फायदा होताना दिसत आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीत सध्या लोकसभेचा केवळ १ खासदार आहे. त्यांना या निवडणुकीत १ ते ३ जागा मिळतील असा कयास आहे. त्यामुळे त्यांनाही फायदा होईल.
महायुतीत सर्वाधिक तोटा एकनाथ शिंदेंना होऊ शकतो. सध्या शिंदेंसोबत १३ खासदार आहेत. पण निवडणुकीत त्यांना केवळ ४ ते ६ जागा मिळू शकतात.
याचा अर्थ शिंदेंच्या गटातील खासदारांची संख्या थेट निम्म्यानं कमी होईल. विशेष म्हणजे ठाकरेंना शिंदेंपेक्षा अधिक जागांवर यश मिळू शकतं. त्यांना ७ ते ९ जागांवर विजय मिळवता येऊ शकतो
.
महायुतीमधील जागावाटपाचा मुद्दा अद्याप मार्गी लागलेला नाही. शिंदेंसोबत सध्याच्या घडीला १३ खासदार आहेत. पण भाजप त्यांना ९ पेक्षा अधिक जागा सोडण्यास तयार नाही.
विद्यमान खासदारांना संधी न मिळाल्यास ते पक्ष सोडून जातील, अशी भीती शिंदे गटात आहे. जिंकण्याची शक्यता आणि क्षमता यावरच जागावाटप होईल अशी स्पष्ट भूमिका भाजपनं घेतली आहे.
तुम्हाला अधिक जागा दिल्यास त्या जागांवर पराभवाची शक्यता वाढेल, अशी जोखीम गृहमंत्री अमित शहांनी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सोबत झालेल्या बैठकीत बोलून दाखवली.