अवघ्या पंधरा महिन्यातच निवडणूक आयुक्तांनी का दिला राजीनामा?मोठे कारण आले समोर
Why did the Election Commissioner resign in just 15 months? The big reason came to light
देशभरात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना काल अचानक निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांनी राजीनामा दिला.
काही दिवसांतच निवडणुकीच्या तारखा जाहीर होतील. त्याआधीच गोयल यांनी राजीनामा दिल्याने खळबळ उडाली आहे. पण त्यांनी अचानक राजीनामा का दिला, याबाबत चर्चांना उधाण आले आहे.
गोयल यांनी राजीनामा देताना वैयक्तिक कारण दिल्याची चर्चा आहे. सरकारने त्यांना राजीनामा देण्यापासून रोखल्याचेही सांगितले जात आहे. पण गोयल यांनी माघार घेतली नाही.
त्यांच्या तब्बेतीचे कारणही पुढे आले होते. पण निवडणूक आयोगातील अधिकाऱ्यांनी गोयल यांची तब्बल ठणठणीत असल्याचा दावा केल्याचे वृत्त आहे.
गोयल आणि मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्यामध्येच मतभेद असल्याचे आयोगातील सुत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्ता आहे. त्यामुळे आता नेमका हा वाद काय होता, यावरूनही तर्कवितर्क लढवले जाऊ लागले आहेत.
दरम्यान, गोयल यांच्या राजीनाम्यामुळे आता राजीव कुमार एकटे पडले आहेत. निवडणूक आयुक्तांची दोन्ही पदे रिक्त झाली आहे.
पुढील आठवड्यात लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राजीव कुमार यांच्यावरच संपूर्ण भार पडणार आहे.
निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी राज्यांच्या दौऱ्यावर राजीव कुमार यांच्यासोबत गोयल असायचे.
दरम्यान, गोयल यांच्या राजीनाम्यांनंतर विरोधी पक्षांनी मोदी सरकावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी म्हटले आहे की, पुढील काही दिवसांत निवडणुकीच्या तारखा जाहीर होतील.
आता केवळ एकच निवडणूक आयुक्त आहेत. असे का? मी आधी म्हटल्याप्रमाणे, जर आपण आपल्या स्वतंत्र संस्थांचा पद्धतशीरपणे होणारा नाश थांबवला नाही, तर आपली लोकशाही हुकूमशाहीने बळकावली जाईल.
निवडणूक आयुक्तपदाचा राजीनामा दिलेले अरुण गोयल हे पंजाब केडरचे माजी IAS अधिकारी आहेत. त्यांनी 21 नोव्हेंबर 2022 रोजी निवडणूक आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारला होता.
त्यांचा कार्यकाळ 2027 मध्ये संपणार होता. यापूर्वी गोयल यांनी अवजड उद्योग मंत्रालयात सचिव म्हणून काम केले होते.