अजित पवारांना होतोय पश्चताप ;ठाकरे गटाच्या आमदाराचा दावा
Ajit Pawar is feeling remorse; Thackeray group MLA claims
राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या सक्रिय राजकारणापासून दूर आहेत. गेल्या आठवड्यात ते अचानक केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीसाठी गेले.
आजारपणातून उठून त्यांनी थेट दिल्ली गाठल्याने अनेक चर्चांना उधाण आले होते. परंतु, ही पूर्वनियोजित भेट असल्याचं भाजपाकडून स्पष्ट करण्यात आलं.
परंतु, यावरून अद्यापही आरोप-प्रत्यारोप सुरूच आहेत. ठाकरे गटाचे आमदार विनायक राऊतांनीही या दिल्ली भेटीवरून मोठा दावा केला आहे. आज त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना ही माहिती दिली.
विनायक राऊत म्हणाले की, “अजित पवारांना पश्चताप होतोय, त्या पश्चातापातून कसं मुक्त व्हायचं याकरता ते विचार करत आहेत. अजित दादा स्पष्टवक्ते आहेत. त्यांच्या कार्यक्षमतेला वाव देण्याचं काम ठाकरेंनी केलं होतं. परंतु, आता त्यांची गळचेपी होत असल्याचं प्रत्येक विधानातून दिसून येतंय.
ते पुढे म्हणाले की, मागच्या आठवड्यातही दिल्लीला जाऊन अजित पवारांनी अमित शाहांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी शिंदेंचं विसर्जन झाल्यावर (मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कार्यकाळ संपल्यावर) आपल्याला मुख्यमंत्री करावं अशी मागणी केल्याची माहिती आहे.
अजित पवारांनी १० नोव्हेंबर रोजी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. अमित शाह यांच्या भेटीच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल,
महाराष्ट्र अध्यक्ष सुनील तटकरे हे देखील सोबत होते. मागील काही दिवसांमध्ये राज्यात राजकीय घडामोडी सुरू आहेत. मराठा आरक्षण आंदोलन, ओबीसी आरक्षण आंदोलनाचा मुद्दा तापला आहे.
राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून महायुतीच्या सरकारमधल्या मंत्र्यांची वेगळी विधानं दिसून आली तसंच मराठा आरक्षणाच्या मुद्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एकटेच आंदोलनाला सामोरे जात असल्याचे चित्र होते.
तर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे निवडणूक प्रचारात होते. तर, अजित पवार हेदेखील आजारी होते. अमित शाह आणि अजित पवार यांच्यात काय चर्चा झाली याचा तपशील समोर आलेला नाही. मात्र महाराष्ट्रातल्या या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जाते आहे.