बैठकीत मुख्यमंत्री शिंदेंच्या सूचनेणे खासदारांची धाकधूक वाढली
In the meeting, Chief Minister Shinde's instructions increased the intimidation of the MPs

महायुतीचं जागावाटप अद्याप जाहीर झालेलं नाही. तीन पक्ष असलेल्या महायुतीमध्ये जागावाटपाचा तिढा कायम आहे. केंद्रीय अमित शहा दोन आठवड्यांपूर्वी राज्यात येऊन गेले.
त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस दिल्लीला जाऊन आले. त्यांनी भाजप नेतृत्त्वाची भेट घेतली.
पण त्यानंतरही जागावाटपचा पेच कायम आहे. त्यातच आता मनसेच्या रुपात चौथ्या भिडूची एन्ट्री होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जागावाटपाचा तिढा आणखी किचकट होऊ शकतो.
राज ठाकरे केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेत असताना दुसरीकडे ठाण्यात शिवसेनेचे खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीसाठी पोहोचले.
यावेळी शिंदेंनी खासदारांसोबत चर्चा करत प्रत्येक मतदारसंघाची माहिती जाणून घेतली. लोकसभा निवडणुकीत आपल्याला महायुती म्हणून काम करायचं आहे.
त्यामुळे वेळप्रसंगी त्याग करायला तयार राहा. उमेदवार कोणताही असला तरीही महायुतीचा उमेदवार म्हणून त्याच्यासाठी काम करण्याचा सल्ला मुख्यमंत्री शिंदेंनी खासदारांना दिल्याचं सुत्रांनी सांगितलं.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्रात आले असताना मुख्यमंत्री शिंदेंनी त्यांची सह्याद्री अतिथीगृहावर भेट घेतली. माझ्या १३ खासदारांची तिकिटं कापून नका.
विद्यमान खासदारांचे मतदारसंघ शिवसेनेला सोडा, अशी विनंती शिंदेंकडे शहांकडे केली. त्यातच आता शिंदेंनी त्यांच्या खासदारांना त्यागाची तयारी ठेवण्यास सांगितलं आहे. त्यामुळे शिंदेंसोबत असलेल्या खासदारांची धाकधूक वाढली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपावरुन महायुतीत कोणताही दुरावा नाही. जागावाटपात प्रत्येकाचा सन्मान राखला जाईल, असं शिंदेंनी त्यांच्या खासदारांना सांगितलं.
‘जागावाटपापेक्षा देशात एनडीएला ४०० पेक्षा अधिक जागा कशा मिळतील. त्यासाठी महाराष्ट्रातून ४५ जागा कशा निवडून येतील हे पाहू, तेच महत्त्वाचं आहे,’ असं शिंदेंनी खासदारांना सांगितल्याचं राहुल शेवाळेंनी सांगितलं.
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील निवासस्थानी काल शिवसेना नेत्यांची बैठक झाली. सकाळी ११ वाजता सुरू झालेली बैठक दुपारी १ वाजता संपली.
या बैठकीला खासदार राहुल शेवाळे, राजेंद्र गावित, भावना गवळी, श्रीरंग बारणे, संजय मंडलिक यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. यातील गवळी, बारणे, मंडलिक यांची उमेदवारी धोक्यात मानली जात आहे.