माजी मुख्यमंत्री बॅ.अब्दुल रहेमान अंतुले यांच्या पत्नी नर्गिस अंतुले यांचे निधन
Nargis Antule, wife of former Chief Minister B. Abdul Rahman Antule, passed away

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर ए.आर. अंतुले यांच्या पत्नी श्रीमती नर्गिस अंतुले यांचे बुधवारी रात्री वृद्धापकाळाने निधन झाले. त्या ८७ वर्षांच्या होत्या.
त्यांचा अंत्यविधी आज गुरुवार आंबेत या मूळगावी त्यांच्या निवासस्थानी होणार आहे. त्यांच्या पश्चात नीलम, मुबीना आणि शबनम
या तीन मुली तसेच त्यांचे जावई मुश्ताक अंतुले असा मोठा परिवार आहे. त्यांचे पुतणे नविद अंतुले यांचे चार वर्षापूर्वीच निधन झाले. अंतुले यांच्या राजकारणात पत्नी नर्गिस यांनी मोठी साथ दिली होती.
बॅरिस्टर अंतुले आणि नर्गिस यांचा १९५७ मध्ये विवाह झाला होता. जेव्हा बॅरिस्टर अंतुले पहिल्यांदा नर्गिस यांना भेटले, तेव्हा पहिल्या नजरतेच त्यांनी नर्गिस यांना प्रेमाचा होकार कळविला,
त्यावेळी नर्गिस या केवळ १६ वर्षांच्या होत्या. त्यांनी पुढे ४ वर्षे वाट पाहिली. नर्गिस यांच्या वयाच्या २० वर्षी त्यांनी अरेंज मॅरेज पद्धतीने बॅरिस्टर अंतुले यांच्याशी विवाह केला.
१९५७ पासून अंतुले यांच्या निधनापावेतो म्हणजेच २०१४ पर्यंत त्यांनी सुखी संसार केला. मुंबईतील चर्चगेट परिसरात त्यांचे वास्तव्य होते. नर्गिस यांना लिखाणाची वाचनाची आवड होती.
बॅरिस्टर अंतुले यांचं नर्गिस यांच्यावर जीवापाड प्रेम होते. त्यांनी नर्गिस यांना अनेक प्रेमपत्रे लिहिली. एकांतात ती प्रेमपत्रे चाळणे, वाचणे,
त्यांच्या आठवणीत रमून जाणे नर्गिस यांना फार आवडायचे. मिस्टर अँड मिसेस अंतुले यांच्या बहारदार प्रेमाच्या नात्याची सगळ्यांना भुरळ होती.
‘अब्दुल रेहमान अंतुले’ यांनी ९ जून १९८० साली मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. अंतुले हे पहिले मुस्लिम व्यक्ती होते, ज्यांनी राज्याचे मुख्यमंत्रिपद भूषवले.
शेतकऱ्यांना पहिल्यांदा कर्जमाफी देणारे मुख्यमंत्री म्हणून त्यांची महाराष्ट्राला ओळख आहे. त्यांचं शिवरायांवरील प्रेम उभ्या महाराष्ट्राला माहिती होते.
त्याच प्रेमातून त्यांनी लंडनवरून भवानी तलवार माघारी आणण्याची घोषणा केली होती. दिवंगत पंतप्रधान आयर्न लेडी इंदिरा गांधी यांचे अतिशय विश्वासू निष्ठावंत सहकारी म्हणून अब्दुल रहमान अंतुले यांची ओळख होती.
माजी मुख्यमंत्री, राज्याचे दिवंगत ज्येष्ठ नेते बॅरिस्टर ए. आर. अंतुले साहेबांना वैयक्तिक आणि सार्वजनिक जीवनात भक्कम साथ देणाऱ्या, त्यांच्या पाठीशी सदैव खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या त्यांच्या पत्नी
श्रीमती नर्गिसताई अंतुले यांच्या निधनाची बातमी ऐकून दुःख झाले. कोकणचा विकास, अल्पसंख्यांक समाजाच्या शैक्षणिक, आर्थिक प्रगतीसाठी त्यांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे मोठं योगदान दिलं आहे.
त्यांच्या निधनानं महाराष्ट्राच्या गेल्या साठ वर्षांच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक जडणघडणीतील एक महत्त्वाचा साक्षीदार आपण गमावला आहे.
पुत्र नविद यांच्या निधनानंतर अंतुले परिवारासाठी हा मोठा धक्का आहे. हे दुःख पचवण्याची शक्ती त्यांच्या कुटुंबियांना, कार्यकर्त्यांना मिळो अशी प्रार्थना करतो. श्रीमती नर्गिसताई अंतुले यांना भावपूर्ण श्रद्धांजली!