शिंदेगट -अजित पवार गट, अंतर्गत वाद टोकाला;राष्ट्रवादीकडून महायुतीतून बाहेर पडण्याचा इशारा
Shindegut-Ajit Pawar group's dispute is at an end; Nationalists warn of exit from the Grand Alliance

बारामती लोकसभा मतदारसंघात यंदा पवार विरुद्ध पवार असा संघर्ष आहे. अजित पवारांच्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली. त्यानंतर बारामतीत वर्चस्व कोणाचं असा प्रश्न निर्माण झाला.
त्या प्रश्नाचं उत्तर यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मिळेल. बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार लढणार असल्याचं जवळपास स्पष्ट झालं आहे.
नणंद विरुद्ध भावजय अशा संघर्षाला काका विरुद्ध पुतण्या असाही पदर आहे. पण या संघर्षात शिवसेनेचे माजी आमदार विजय शिवतारेंनी अजित पवारांचं टेन्शन वाढवलं आहे.
१२ एप्रिलला दुपारी १२ वाजता बारामती लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार आणि पवारांचे बारा वाजवणार, असा निर्धार शिवसेनेचे नेते शिवतारेंनी केला आहे.
यावरुन राष्ट्रवादीनं आक्रमक पवित्रा घेतला आहे. शिवतारेंवर निलंबनाची कारवाई करा. त्यांची पक्षातून हकालपट्टी करा. अन्यथा आम्ही महायुतीतून बाहेर पडू असा निर्वाणीचा इशारा राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी दिली आहे.
विजय शिवतारे गेल्या अनेक दिवसांपासून आमच्या उपमुख्यमंत्र्यांना लक्ष्य करत आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी आम्ही सातत्यानं करत आहोत.
त्यांनी आमच्या नेत्यांबद्दल बोलताना आक्षेपार्ह भाषा वापरली. त्यामुळे आता त्यांची हकालपट्टी करण्यात यावी. तरच आमचं ,माधान होईल. अन्यथा आम्ही महायुतीतून बाहेर पडण्याचा विचार करू, असं म्हणत उमेश पाटील यांनी थेट इशारा दिला.
शिवतारेंवर कारवाई करण्याची मागणी आम्ही एकनाथ शिंदेंकडे अनेकदा केली. पण शिवसेनेनं त्यांच्याविरोधात कोणतीही कारवाई केली नाही.
त्यामुळे महायुतीत राहायचं की नाही याचा विचार आम्ही गांभीर्यानं करत आहोत. गोष्टी हाताबाहेर जाऊ लागल्या आहेत. हे सगळं सहनशक्तीच्या पलीकडे गेलं आहे.
आमच्या नेत्यांवर अशा शब्दांमध्ये होणारी टीका सहन केली जाणार नाही. यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये केवळ कटुता निर्माण होईल.
याचा परिणाम महायुतीच्या कामगिरीवर होईल. हे सगळं थांबायला हवं. शिंदेंनी शिवतारेंची हकालपट्टी करायला हवी, अशी मागणी पाटील यांनी केली.
लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने बारामती लोकसभा मतदारसंघात हाय व्होल्टेज ड्रामा सुरु आहे. महायुतीतील नेत्यांनीच एकामेकांना विरोधात दंड थोपटल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.
एकीकडे पवार कुटुंबीयांना आव्हान देत माजी आमदार विजय शिवतारे यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्धार केला आहे.
तर दुसरीकडे इंदापूरमधून विधानसभेचा शब्द घेतल्याशिवाय लोकसभेचे काम करणार नाही असा पवित्र माजी मंत्री हर्षवर्धन पाटलांनी घेतल्याचं पाहायला मिळत आहे.
त्यामुळे बारामतीतील हा वाद मिटवण्यासाठी काल रात्री उशिरापर्यंत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावरती खलबतं सुरु होती.
फडणवीस यांनी वादावरती पडदा टाकण्यासाठी हर्षवर्धन पाटील यांच्या समवेत रात्री उशिरापर्यंत चर्चा केली. त्यानंतर फडणवीसांनी अजित पवार यांच्याशी फोनवरून चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे.
या बैठकीदरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी पुढील आठवड्यात इंदापूर येथे मेळाव्याचे आयोजन करण्याच्या सूचना दिल्या आहेत.या मेळाव्यामध्ये हर्षवर्धन पाटील देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार एकत्रित कार्यकर्त्यांची संवाद साधून संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न करणार आहेत.
तसंच हर्षवर्धन पाटील यांच्यावर बारामतीसह पश्चिम महाराष्ट्रातील लोकसभेच्या प्रचाराची जबाबदारी देण्यात आली आहे.त्यामुळे पुढील कालावधीमध्ये हर्षवर्धन पाटील बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये महायुतीचा प्रचार करताना दिसतील. एकूणच ही चर्चा सकारात्मक झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी हर्षवर्धन पाटील यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला असला तरी त्यांना समज देखील दिल्याचं बोललं जात आहे.
विधानसभेबाबतचा शब्दासाठी आडलेल्या हर्षवर्धन पाटलांना “विधानसभेसंदर्भात निर्णय वेळ आल्यावर घेऊ. आता लोकसभेच्या उमेदवाराचा प्रचार करा,” असे आदेश दिले आहेत.
बारामती मतदारसंघांमधून महायुतीचा जो उमेदवार असेल त्याचं काम करा . विरोधात कोणताही प्रचार करू नका आणि समर्थकांनाही तशी समज द्या; असे आदेश फडणवीसांनी पाटलांना दिले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून देण्यात येणाऱ्या धमक्यांबाबत योग्य ती कारवाई करू असे आश्वासनदेखील देवेंद्र फडणवीसांनी दिलं असल्याचं बोललं जात आहे.