वंचितचा महाविकास आघाडीला या 7 जागांवर बसणार फटका?
Vanchit's Mahavikas Aghadi will hit these 7 seats?

महाविकास आघाडीसोबतची बोलणी फिस्कटल्यानं वंचित बहुजन आघाडी पुन्हा एकदा स्वतंत्र लढणार असल्याचं स्पष्ट झालं. प्रकाश आंबेडकरांनी उमेदवारांची घोषणादेखील केली आहे.
२०१९ मध्ये वंचितमुळे अनेक मतदारसंघांमध्ये तिरंगी लढत झाली. त्याचा फटका काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसला बसला. तर भाजप, शिवसेनेला फायदा झाला. आघाडीचे ७ उमेदवार वंचितमुळे पडले.
गेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादीचा धु्व्वा उडाला. त्यावेळीही वंचितसोबतची बोलणी फिस्कटली होती. वंचितच्या उमेदवारांनी १५ जागांवर ९० हजार ते ३ लाखांपर्यंत मतं घेतली.
त्यामुळे ७ जागांवर आघाडीचे उमेदवार पराभूत झाले. आंबेडकरांनी एमआयएमच्या साथीनं वंचित बहुजन आघाडी तयार केली होती. या आघाडीनं साडे सात टक्के मतं घेतली. छत्रपती संभाजीनगरमधून एमआयएमचा उमेदवारही विजयी झाला.
वंचितची २०१९ मध्ये उमेदवाराने घेतलेली मते
१. नांदेड- वंचितच्या यशपाल भिंगेंनी १ लाख ६६ हजार १९६ मतं घेतली होती. काँग्रेसच्या अशोक चव्हाणांचा फक्त ४० हजार मतांनी पराभव झाला होता.
२. बुलढाणा- राष्ट्रवादीचे डॉ. राजेंद्र शिंगणे १ लाख ३३ हजार २८७ मतांनी पराभूत झाले होते. या मतदारसंघात वंचितच्या बळीराम सिरस्कारांनी जवळपास पावणे दोन लाख मतं घेतली होती.
३. गडचिरोली-चिमूर- काँग्रेसच्या डॉ. नामदेव उसेंडी यांचा ७७ हजार ५२६ मतांना पराभव झाला होता. इथे वंचितचे उमेदवार रमेश गजबेंना १ लाख ११ हजार ४६८ मतं मिळाली होती.
४. परभणी- काँग्रेसचे राजेश विटेकर यांचा केवळ ४२ हजार १९९ मतांनी पराभव झाला होता. वंचितच्या आलमगीर खान यांनी दीड लाख मतं घेतली होती.
५. सोलापूर- माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांचा १ लाख ५८ हजार ६०८ मतांनी पराभव झाला होता. वंचितच्या प्रकाश आंबेडकरांनी १ लाख ७० हजार मतं मिळवली होती.
६. हातकणंगले- स्वाभिमानीचे राजू शेट्टी यांचा ९६ हजार मतांनी पराभव झाला होता. वंचितच्या अस्लम सय्यद यांनी सव्वा लाख मतं घेतली होती.
७. सांगली- स्वाभिमानीकडून लढलेल्या विशाल पाटील यांचा १ लाख ६४ हजार मतांनी पराभव झाला होता. वंचितच्या गोपीचंद पडळकर यांनी तब्बल ३ लाख मतदान घेतलं होतं.