महायुतीतील घटकपक्षाचा काँग्रेस उमेदवाराला पाठिंबा
Constituent parties in the Grand Alliance support the Congress candidate

देशभरात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून सर्वत्र राजकीय पक्षानी आपली कंबर कसली आहे. अशातच महाविकास आघाडी आणि महायुतीमधील जागावाटपाचा तिढा अद्याप कायम असून
रोज नवे दावे-प्रतिदावे सध्या करण्यात येत आहे. अशातच राज्यात महायुतीतलाच घटक पक्ष असलेला ‘प्रहार पक्ष’ आज आपल्या वेगवेगळ्या भूमिका जाहीर करताना दिसत आहे.
विषेश म्हणजे लोकसभा निवडणुकीचे घोडेमैदान जवळ असतानाच युती आणि आघाड्यांकडून वेगवेगळया प्रक्रिया जोमाने सुरु आहेत.
त्यात प्रहार पक्षानं अमरावती लोकसभा मतदारसंघात आपली वेगळी भूमिका घेत मोठी राजकीय खेळी खेळल्याचे बोलले जात असताना
आता बच्चू कडू अकोल्यातील काँग्रेसचे उमेदवार डॉ. अभय पाटील यांना पाठिंबा देणार असल्याची बातमी समोर आली आहे.
अमरावती पाठोपाठ आता अकोल्यातही बच्चू कडूंचा प्रहार जनशक्ती पक्ष वेगळ्या मूडमध्ये असल्याचं दिसतंय. बच्चू कडू हे अकोल्यात महाविकास आघाडीतील काँग्रेस उमेदवार डॉ. अभय पाटील यांना पाठींबा देण्याची शक्यता आहे.
रविवारी अकोल्यात प्रहार जनशक्ती पक्षाचा जिल्हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात प्रहार वेगळा निर्णय घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
अमरावती प्रमाणेच अकोल्यातही बच्चू कडू हे भाजपवर नाराज असल्याचं बोललं जातंय. त्यामुळे आज अकोल्यात होणाऱ्या बैठकीत बच्चू कडू नेमका काय निर्णय घेतात याकडे सऱ्यांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, आज 7 एप्रिलला प्रहार पक्षाच्या कार्यकर्त्यांची बैठक होणार आहे. ही बैठक पक्षाचे सर्वेसर्वा बच्चू कडूंच्या नेतृत्वात हॉटेल सेंटर प्लाझा इथे पार पडणार आहे.
या बैठकीत प्रहार आपल्या पुढील भूमिकेसंदर्भात निर्णय घेणार आहे. त्यामुळ प्रहार पक्ष अकोला लोकसभा मतदारसंघात नेमका कोणाला पाठिंबा देणार, की आपली काही वेगळी भूमिका घेणार,
हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तसेच या बाबतचा खुलासाही खुद्द बच्चू कडू आज अकोल्यात पत्रकार परिषद घेत जाहीर करणार आहेत.
महाविकास आघाडीचे सरकार असताना बच्चू कडू अकोल्याचे पालकमंत्री राहिले आहेत. तसेच जिल्ह्यातील अकोट विधानसभेत प्रहारला 25 हजार तर मूर्तिजापूर विधानसभेत 10 हजार मतदान मिळाले होतं.
अकोला जिल्हा परिषदेत प्रहारचा एक जिल्हा परिषद सदस्यही होता. तर अकोट पंचायत समितीतही एक सदस्य आहे. त्यामुळे बच्चू कडूंनी
अकोल्यातील काँग्रेसचे उमेदवार डॉ. अभय पाटील यांना पाठिंबा दिल्यास अकोल्यात मोठी राजकीय खळबळ उडणार आहे.
तसेच या संभाव्य निर्णयाचा मोठा परिणाम अकोला लोकसभेच्या राजकारणावर देखील होऊ शकतो. परिणामी, कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर राखून आपण निर्णय घेणार असल्याची माहिती आहे