इराणने डागली इस्रायलवर 200 क्षेपणास्त्र; भीतीनं जग हादरले

Iran fires 200 missiles at Israel; The world shook with fear

 

 

 

 

इराण आणि इस्रायल यांच्यात अखेर युद्धाचा भडका उडाला आहे. इस्रायलने सीरियात इराणच्या दुतावासावर हल्ला केला होता.

 

 

 

 

या कृतीचा बदला घेण्यासाठी शनिवारी रात्री इराणने इस्रायलवर तब्बल २०० क्षेपणास्त्र डागली. ड्रोन हल्लाही केला. मात्र, त्यातील बहुतांश क्षेपणास्त्रे इस्रायलने हवेतच नष्ट केली असल्याचे इस्रायल लष्करांचं म्हणणे आहे.

 

 

 

हल्ल्यामुळे इस्रायल संरक्षण दलाच्या तळाचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. इराणच्या माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात बॅलेस्टिक क्षेपणास्त्र डागण्यात आले. इराण आणि इस्रायलमध्ये सुमारे 1800 किलोमीटरचे अंतर आहे.

 

 

 

इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशन गार्ड कॉर्प्स ने एक निवेदन जारी करुन अमेरिकेलाही इशारा दिला आहे. हा हल्ला एका खास लक्ष्याच्या उद्देशाने करण्यात आला आहे. ही लढाई इस्रायलशी आहे. अमेरिकेने त्यापासून दूर राहावे, असं म्हटलं आहे.

 

 

 

 

 

इस्रायलचं गाझापट्टीत यापूर्वीच युद्ध सुरु असल्यानं आता दोन आघाड्यांवर इस्त्रायलला लढावं लागणार आहे. दरम्यान इराण हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आहे.

 

 

 

 

संरक्षण यंत्रणा कामाला लागलीय. आम्ही कोणत्याही परिस्थितीसाठी तयार आहोत. मग ते बचावात्मक असो वा आक्रमक. इस्रायल एक मजबूत देश आहे. इस्त्राईल संरक्षण दल आणि जनता देखील मजबूत आहे, असं इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहून यांनी म्हंटलंय.

 

 

 

संयुक्त राष्ट्र संघानं या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. सुरक्षा परिषदेची तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे. इराणने हल्ला केल्यानंतर इस्रायलला मदत करण्यासाठी मित्र देश सरसावले आहेत.

 

 

 

 

अमेरीकेसह ब्रिटन, फ्रान्स मदतीसाठी पुढे आले आहेत. इस्रायलच्या सुरक्षेला आपला पाठिंबा ठाम असल्याचे अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी म्हटले आहे.

 

 

 

 

 

इराणच्या ‘रिव्हॉल्युशनरी गार्ड्स’ने शनिवारी यूएई म्हणजेच संयुक्त अरब अमिरातीहून भारताकडे येणाऱ्या एका मालवाहू जहाजाचा ताबा घेतला.

 

 

 

 

 

हे जहाज इस्रायलच्या उद्योगपतीचं आहे. हेलिकॉप्टरच्या मदतीने इराणचे कमांडो जहाजावर उतरले आहेत. या जहाजातील 17 कर्मचारी भारतीय आहेत. त्यांच्या सुटकेसाठी भारत सरकारने प्रयत्न सुरू केले आहेत. जहाज ताब्यात घेतल्यावर इस्त्राईल संतप्त झाला आहे.

 

 

 

 

दरम्यान, युद्ध आणखी भडकू नये, जगात शांतता नांदावी यासाठी काही देश प्रयत्न करतायेत. इस्त्राईल, इराण या दोन्ही राष्ट्रांना संयम राखण्याचं आवाहन करण्यात येत आहे.

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *