मोदींची ऑफर स्वीकारणार काय? काय म्हणाले शरद पवार
Will you accept Modi's offer? What did Sharad Pawar say?
शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी काँग्रेससोबत जाण्यापेक्षा, काँग्रेसमध्ये विलीन होण्यापेक्षा आमच्यासोबत यावं, अशी थेट ऑफर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली आहे.
ते नंदुरबारच्या सभेत बोलत होते. येत्या काळात देशातील लहान प्रादेशिक पक्ष काँग्रेसच्या जवळ जातील. काही पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील,
असं भाकित शरद पवारांनी वर्तवलं होतं. तोच धागा पकडत मोदींनी जाहीर सभेतून शरद पवारांना आणि उद्धव ठाकरेंना ऑफर देऊन टाकली आहे.
भाजपच्या खासदार हिना गावित यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी नंदूरबारमध्ये आहेत. त्यांनी गावित यांच्या प्रचारासाठी सभा घेतली.
जिल्ह्यात पीएम आवास योजनेच्या माध्यमातून सव्वा लाख घरं दिली. आदिवासी समाजासाठी कल्याणकारी योजना राबवल्या, असं मोदी भाषणात म्हणाले. यावेळी मोदींनी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना सोबत येण्याची ऑफर दिली.
‘महाराष्ट्रातील एक दिग्गज नेते ४० ते ५० वर्षांपासून राजकारणात आहेत. बारामतीमधील निवडणुकीनंतर ते इतके चिंताग्रस्त आहेत की त्यांनी एक विधान केलंय.
बऱ्याच लोकांशी सल्लामसलत करुनच त्यांनी हे विधान केलं असावं. ते इतके हताश, निराश झालेत की त्यांना असं वाटतंय की ४ जूननंतर सार्वजनिक आयुष्यात, राजकीय आयुष्यात टिकून राहायचं असेल तर
लहान लहान राजकीय पक्षांना काँग्रेसमध्ये विलीन व्हावं लागेल. याचा अर्थ नकली राष्ट्रवादी, नकली शिवसेनेनं काँग्रेसमध्ये विलीन होण्यासाठी मनाची तयारी केलेली आहे.
४ जूननंतर काँग्रेसमध्ये जाऊन मरण्यापेक्षा छातीठोकपणे आमच्या अजित पवार, एकनाथ शिंदेंकडे या. तुमची स्वप्नं पूर्ण होतील,’ अशी थेट ऑफर मोदींनी दिली.
देशातील संसदीय लोकशाही मोदींमुळे संकटात आली असल्याची टीका शरद पवारांनी केली. ज्यांच्यामुळे देशातील लोकशाही संकटा आली. जनमत त्यांच्या विरोधात आहे.
त्यांच्यासोबत आम्ही जाणार नाही. आम्ही नेहरु, गांधी यांची विचारसरणी मानणारे आहोत. त्यामुळे भाजपसोबत जाण्याचा प्रश्नच येत नाही, असं शरद पवार म्हणाले.
‘दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना तुरुंगात टाकण्यात आलं. या कारवाईमागे केंद्र सरकार आहे. त्यांच्या सहभागाशिवाय हे होऊ शकत नाही.
ज्यांचा लोकशाहीवर विश्वास नाही, त्यांच्यासोबत आम्ही कधीही जाणार नाही. मोदी करत असलेली विधानं देशाच्या ऐक्याच्या
दृष्टीनं घातक आहेत. त्यांचा विचार देशासाठी घातक आहेत. अशांसोबत आम्ही जाऊ शकत नाही,’ असं पवारांनी पुढे सांगितलं.
तर दुसरीकडे मोदींची ही ऑफरवर पराभूत मानसिकतेतून आलेली आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.
ते म्हणाले, भाजपाने लोकसभा निवडणुकीत सर्व प्रकारची ‘कार्ड’ खेळून बघितले. पण त्याला जनतेने प्रतिसाद दिलेला नाही. त्यामुळे नरेंद्र मोदींना दररोज नवे ‘कार्ड’ वापरावे लागत आहे.
ज्यांच्यावर कालपर्यंत कठोर टीका केली त्यांनाच ऑफर देण्याची वेळ मोदी यांच्यावर आली आहे. मोदी यांची शरद पवारांना ऑफर देणे म्हणजे ४ जूनला केंद्रात इंडिया आघाडीचे सरकार येणार या राहुल गांधी यांच्या विधानाला नरेंद्र मोदी यांचा दुजोराच आहे.
शंकराचार्यांनी अयोध्येतील राम मंदिरबाबत घेतलेल्या भूमिकेशी काँग्रेस सहमत आहे. काँग्रेस सत्तेत आल्यानंतर शंकराचार्यांच्या माध्यमातून राम मंदिराचे शुद्धीकरण केले जाईल. तसेच श्रीरामांचा भव्य दरबार लावण्यात येईल, असे वक्तव्य नाना पटोले यांनी केले.