निवडणूकीचे रिपोर्टींग करणाऱ्या पत्रकाराचा बीडमध्ये मृत्यू
Journalist reporting on elections dies in Beed

बीड लोकसभा निवडणुकीचे वार्तांकन करण्यासाठी मुंबई येथून अंबाजोगाई शहरात आलेले ‘आज तक’ वृत्तवाहिनीचे व्हिडिओ जर्नलिस्ट वैभव कनगुटकर यांचे दुःखद निधन झाले.
हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने आज (सोमवारी) पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या अकस्मात निधनाने पत्रकारिता विश्वासह कुटुंब आणि मित्र परिवारावर शोककळा पसरली आहे.
बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे लोकसभा निवडणुकांच्या चौथ्या टप्प्यातील मतदानाचे वार्तांकन करण्यासाठी मुंबई तकचे
वरिष्ठ पत्रकार अभिजीत कारंडे यांच्यासह वरिष्ठ कॅमेरामन वैभव कनगुटकर गेले होते. अंबाजोगाई येथील राज हॉटेलमध्ये ते वास्तव्याला होते.
सकाळी हॉटेलमधून ते निघाले, त्यांनी एका वॉकथ्रूचे शूट केले. मात्र त्यावेळी अस्वस्थ वाटत असल्याने ते गाडीत बसले. मात्र त्यातच त्यांचा करुण अंत झाला.
अत्यंत शांत, संयमी आणि मृदूभाषी स्वभावाचे म्हणून वैभव कनगुटकर कुटुंब, सहकारी आणि मित्र परिवारामध्ये परिचित होते.
ते ठाण्यात वास्तव्याला होते. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुली असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने कुटुंब, सहकारी शोकसागरात बुडाले आहेत.