Exit Pollमहाराष्ट्र ; भाजप नेते नाराज ! ,मागितला अहवाल ,राज्यात होणार नेतृत्व बदल ?
Exit Poll Maharashtra ; BJP leaders upset! , the requested report, there will be a leadership change in the state?
राज्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीचा सर्व्हे समोर आला आहे. या सर्व्हेमधून महाराष्ट्रात महायुतीला 22 आणि महाविकास आघाडीला 25 जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
या सर्व्हेनुसार महायुतीचे घटकपक्ष भाजपला 18, शिंदे गटाला 4, अजितदादा गटाला 0 तर महाविकास आघाडीमधील पक्ष कॉंग्रेस 5, राष्ट्रवादी ( शरद पवार गट ) 6 आणि ठाकरे गटाला 14 जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
मात्र, हा सर्व्हे येण्याआधीच भाजप नेत्यांनी केंद्रीय नेतृत्वाला गोपनीय अहवाल पाठविण्यात आल्याची माहिती समोर आलीय.
या अहवालामध्ये महाराष्ट्रात शिवसेना शिंदे गटाला अपेक्षित यश न मिळाल्यास नेतृत्व बदलाची शिफारस करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
लोकसभा पाठोपाठ येणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर त्याचा परिणाम दिसून येईल. शिंदे यांच्या नेतृत्वाखाली विधानसभा निवडणूक जिंकणे अवघड आहे अशी भीती भाजप नेत्यांना वाटत आहे.
राजकीय पटलावर महाराष्ट्राच्या निवडणुकांना अधिक महत्त्व आहे. उत्तर प्रदेश नंतर सर्वाधिक जागा महाराष्ट्रात आहेत. त्यामुळेच भाजपने महाराष्ट्रात अधिक लक्ष दिले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही राज्यात 18 हून जास्त सभा घेतल्या. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली नव्हती.
त्यावेळी भाजपने 23 जागा जिंकल्या होत्या. अमरावतीमधून विजयी झालेल्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी भाजपला पाठिंबा दिला होता.
तर, शिवसेनेला 18 जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे भाजप शिवसेना युतीने 41 चा आकडा पार केला होता. मात्र, त्यानंतर बदललेल्या राजकीय समीकरणात शिवसेना आणि राष्ट्रवादी या पक्षात फुट पडली.
भाजपने एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्ष अशी महायुती तयार करून लोकसभा निवडणूक लढविली.
तर, इकडे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी कॉंग्रेसला सोबत घेऊन महाविकास आघाडी निर्माण केली. सुरवातीला 40 हून अधिक जागा मिळण्याचा दावा करणाऱ्या भाजप नेत्यांनी निवडणुकीचा माहोल पाहून तसेच स्वतःचा सर्व्हे करून अहवाल तयार केला.
यानुसार महायुतीला केवळ 23 जागा मिळतील असा अंदाज समोर आला. शिंदे गटाला 8 पेक्षा अधिक जागा देण्यास भाजपने नकार दिला होता. पण, शिंदे यांनी 15 जागांचा आग्रह धरला. मात्र, या 15 जागा देऊन चूक झाली असे भाजप नेत्यांना वाटत आहे.
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आगामी विधानसभा निवडणुक लढल्यास त्या निवडणुकीतही भाजपला सर्वाधिक फटका बसू शकतो असे या अहवालामधून समोर आले आहे.
सध्याच्या नेतृत्वाकडे निवडणुकीतील यश मिळवण्याची क्षमता नाही. त्यांच्याकडे विश्वासाची कमतरता असल्यामुळे राज्यातील नेतृत्व बदलाची मागणी भाजप नेत्यांनी केंद्रीय नेतृत्वाकडे केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
लोकसभा निवडणुकीचा निकाल 4 जून रोजी जाहीर होणार आहे. या निकालानंतर महाराष्ट्रात नेतृत्व बदलाची शक्यता आहे. केंद्रीय नेतृत्वाने याची गंभीर दखल घेतली आहे.
शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका जिंकण्यासाठी पक्षाला अधिक संघर्ष करावा लागेल याची केंद्रीय भाजप नेतृत्वाला खात्री झाली आहे.
त्यामुळेच लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर भाजपचा नेता राज्यात सत्तेवर येण्याची शक्यता आहे, असेही या सूत्रांनी सांगितले.