मंत्रीमंडळात अजित पवार गटाला स्थान नाही; देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
Ajit Pawar group has no place in the cabinet; Devendra Fadnavis told the reason
नरेंद्र मोदी आज तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार असून आज त्यांच्या मंत्रीमंडळात भाजपाचा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला स्थान मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. आज दिल्लीतील महाराष्ट्र सदनात भाजपाच्या खासदारांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.
“राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला एक जागा देण्यात येणार होती. तसा प्रस्ताव आम्ही त्यांना दिला होता. राज्यमंत्री स्वतंत्र्य प्रभार, अशी ही जागी होती.
मात्र, त्यांना केंद्रीय मंत्रीपद मिळावं, असा त्यांचा आग्रह होता. ‘आमच्याकडून प्रफुल्ल पटेल यांचे नाव अंतिम करण्यात आलं असून ते यापूर्वी मंत्री राहिले आहेत.
त्यामुळे त्यांना राज्यमंत्रीपद देता येणार नाही’, असं राष्ट्रवादीकडून ( अजित पवार गट) सांगण्यात आलं, त्यामुळे केंद्रीय मंत्रीमंडळात अजित पवार गटाचा समावेश नसेल”, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
“जेव्हा युतीचं सरकार असतं तेव्हा काही निकष तयार केले जातात. एका पक्षासाठी असे निकष मोडता येत नाहीत. त्यामुळे भविष्यात जेव्हाही केंद्रीय मंत्रीमंडळाचा विस्तार होईल
तेव्हा निश्चितपणे राष्ट्रवादी काँग्रेसचा (अजित पवार गट) विचार केला जाईल, यासंदर्भात जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसशी ( अजित पवार गट) बोलणं झालं,
तेव्हा आम्हाला यावेळी शक्य नसेल तर पुढच्या वेळी पण केंद्रीय मंत्रीपद द्या, असं सांगण्यात आलं”, असं फडणवीस यांनी सांगितले.
यावेळी बोलताना त्यांनी महाराष्ट्रातील जे खासदार मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत, त्यांचं अभिनंदनही केलं. “जे खासदार आज मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत, त्यांची मी अभिनंदन करतो.
विशेषत: नितीन गडकरी, पीयुष गोयल, रामदास आठवले हे पुन्हा एकदा मंत्री बनणार आहेत. याशिवाय रक्षा खडसे तसेच मुरलीधर मोहोळ यांच्यासारखे अतिशय तरुण खासदार मंत्रीमंडळात सहभागी होत आहे, याचा मला आनंद आहे”, असे म्हणाले.