शरद पवारांच्या राष्ट्रवादीला निवडणूक आयोगाचा मोठा दिलासा
Big relief for Sharad Pawar's NCP from Election Commission
लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यात 10 पैकी आठ जागा जिंकून महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक स्ट्राईक रेट दिलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मोठा दिलासा मिळाला आहे.
निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेसला अधिकृत मान्यता म्हणून मिळाली आहे. त्यामुळे कलम 29 ब नुसार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार
पक्षाला आता देणगी स्वीकारता येणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासह शरद पवार यांना सुद्धा मोठा दिलासा मिळाला आहे.
या निर्णयानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सुप्रिया सुळे यांनी सांगितले की आज आमच्या चार वेगवेगळ्या महत्त्वाच्या सुनावण्या दिल्लीमध्ये होत्या.
त्या पुढे म्हणाल्या की, शरद पवारांचा पक्षज्या पद्धतीने काढून घेतला ते पाहता जनतेने आम्हाला आशीर्वाद दिले. त्याबद्दल जनतेचे आभार मानतो.
आम्हाला तुतारी हे चिन्ह तात्पुरत्या स्वरूपात देण्यात आलं होतं, पण आम्हाला चेक घेण्याचा अधिकार देण्यात आला नव्हता. तसेच कर लाभ सुद्धा मिळत नव्हते. आता आमची विनंती मान्य करण्यात आली आहे.
त्याचबरोबर तुतारी चिन्हावरून होणाऱ्या संभ्रमावस्थेबद्दल होती. तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी दुसरी तुतारी देण्यात येऊ नये अशी विनंती केली असल्याचे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
असा अन्याय इतर कोणत्याही पक्षावर होऊ नये यासाठी विनंती केल्याचे सुप्रिया सुळे यांनी सांगितले. दरम्यान, शरदचंद्र पवार पक्षाकडून चिन्हासंदर्भात करण्यात आलेल्या विनंतीवर आयोगाने आम्हाला अभ्यास करू असे सांगितले असल्याचे त्यांनी सांगितले.