मराठा आरक्षणावर शरद पवारांनी भूमिका जाहीर करावी; अजितदादांचे आवाहन
Sharad Pawar should announce his stance on Maratha reservation; Ajitdad's appeal

मराठा आरक्षणावर शरद पवार आणि महाविकास आघाडीकडे कोणता मार्ग आहे तो त्यांनी जाहीर करावा असं आवाहन राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने केलं आहे.
मराठ्यांना सरसकट ओबीसीतून आरक्षण देण्याचा मार्ग असेल तर शरद पवारांनी आपली भूमिका जाहीर करावी अशी मागणीही
अजित पवार गटाकडून करण्यात आली आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी मराठा आरक्षणावर त्यांच्या पक्षाची भूमिका मांडली.
उमेश पाटील म्हणाले की, “सर्वपक्षीय नेत्यांची मराठा आरक्षण प्रश्नाच्या अनुषंगाने बैठक पार पडली होती. विरोधक त्या बैठकीला नव्हते.
शरद पवार यांना माझा सवाल आहे की मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्याचा कोणता मार्ग त्यांच्याकडे आहे? ओबीसीमधून मराठा आरक्षण देण्याबाबत महाविकास आघाडीकडे कोणता मार्ग आहे हे त्यांनी स्पष्ट करावं.”
सध्या राज्य सरकारच्या विरोधात आंदोलन सुरू आहे. विरोधकांनी देखील स्पष्ट करावं त्यांच्याकडे असा कोणता मार्ग आहे की मराठा समाजाला सरसकट ओबीसीतून आरक्षण देता येईल असं उमेश पाटील म्हणाले.
राज्यांत मराठा-ओबीसी आरक्षण वाद नको असेल तर विरोधकांनी आपली आरक्षणाच्या बाबत असलेली भूमिका स्पष्ट करावी असं आवाहन उमेश पाटील यांनी केलं.
जितेंद्र आव्हाड म्हणालेत की आम्ही सत्तेत आलो की ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देऊ, मग असा कोणता मार्ग त्यांच्याकडे आहे हे त्यांनी आधी स्पष्ट करावं असं उमेश पाटील म्हणाले.
तिसरी आघाडी करण्याबाबतची जी बातमी आली ती एकदम चुकीची आहे, असा कोणताही विचार पक्षात नसल्याची माहिती उमेश पाटील यांनी दिली.
ओबीसी आरक्षण बचावासाठी आंदोलन करणाऱ्या लक्ष्मण हाके यांनीही राज्यातील आरक्षणाच्या प्रश्नावर शरद पवारांनी मध्यस्ती करावी अशी विनंती केली आहे.
विशाळगड प्रकरणात जी बाब चुकीची आहे ती चुकीचीच आहे असं उमेश पाटील म्हणाले. गडावर अतिक्रमण केलेलं असेल तर ते काढायला हवं, मग तिथं जात पात धर्म पाहू नये. सरकार योग्य तो निर्णय घेत आहे अस मतही उमेश पाटील यांनी व्यक्त केलं.