हिरे व्यापाऱ्याची गेट वे ऑफ इंडियाजवळच्या समुद्रात उडी घेत आत्महत्या
A diamond merchant committed suicide by jumping into the sea near the Gateway of India

65 वर्षीय हिरे व्यावसायिकाने गेट वे ऑफ इंडिया इथून समुद्रात उडी घेत आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. रविवारी सकाळी ही घटना घडली आहे.
ताज हॉटेल येथील सीसीटिव्ही कॅमेरा तपासल्यानंतर वृद्धाने कुलाबा येथे समुद्रात उडी घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. रविवारी सकाळी 9.30 च्या सुमारास ताज हॉटेलच्या समोरच ही घटना घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय शांतीलाल शहा असं या व्यावसायिकाचे नाव आहे. ते महालक्ष्मी येथे आपल्या कुटुंबासह राहतात.
संजय शहा हे गेल्या दोन ते तीन वर्षांपासून डिप्रेशनमध्ये होते. व्यवसायात नुकसान झाल्यामुळं ते तणावात होते. म्हणूनच त्यांनी
आत्महत्येसारखे पाऊल उचलल्याची चर्चा आहे. पोलिस या प्रकरणी तपास करत असून अद्याप पोलिसांना कोणतीही सुसाइड नोट सापडली नाहीये.
पोलिस तपासात समोर आले आहे की, संजय शहा हे आधी वांद्रे वरळी सी लिंकयेथून समुद्रात उडी घेऊन आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात होते.
मात्र, टॅक्सीवाल्याने टॅक्सी थांबवण्यास नकार दिल्याने ते कुलाबा येथे आले. संजय शाह यांनी त्यांच्या कुटुंबीयांना मॉर्निंग वॉकचे कारण देऊन घराबाहेर पडले होते.
सकाळी लवकरच ते घराबाहेर पडले होते. त्यानंतर ते ताज हॉटेल येथे पोहोचले आणि तिथून पुढे असलेल्या गेट वे ऑफ इंडियाइथून समुद्रात उडी घेतली.
शाह यांनी समुद्रात उडी घेतल्यानंतर स्थानिकांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. लाइफगार्डने त्यांना पाण्याबाहेर काढले. तसंच,
त्यांच्या शरीरातील पाणीदेखील बाहेर काढण्यात आले. त्यांना वगेचच सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तोपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहा यांनी तिनवेळी सीलिंकवर टॅक्सी थांबवायचा प्रयत्न केला. त्यानंतर ते कुलाबा येथे गेले आणि तेथून त्यांनी समुद्रात उडी घेतली.
हा संपूर्ण घटनाक्रम ताज हॉटेलच्या सीसीटीव्हीत कैद झाला आहे. त्यामुळं त्यांनी स्वतःहून समुद्रात उडी घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.
शहा यांना गेल्या काही वर्षांत व्यवसायात खूप नुकसान झेलावे लागले होते. त्यामुळंच त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतला.