भाजप नेत्यांची संघाकडे विनवणी आता दादांवर टीका नको
BJP leaders request the Sangh not to criticize Dada now

भारतीय जनता पक्षाला आधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची गरज लागायची. पण आता भाजप सक्षम आहे. आता भाजप स्वत:ला चालवतो,
असं विधान भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांनी लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना केलं होतं. यानंतर संघाची नाराजी दिसून आली.
त्याचा फटका भाजपला निवडणुकीत बसल्याचं बोललं जातं. भाजपच्या ६३ जागा घटल्या आणि पक्ष बहुमतापासून दूर राहिला. त्यांना सरकार स्थापनेसाठी मित्रपक्षांची मदत लागली.
यानंतर आता भाजपकडून संघाच्या मनधरणीचे प्रयत्न सुरु झाले आहेत. भाजपच्या प्रमुख नेत्यांनी मुंबईत संघाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी बंद दाराआड चर्चा केली.
लोकसभा निवडणुकीत संघानं मदतीचा हात आखडता घेतल्याचा फटका भाजपला बसला. या निमित्तानं संघानं आपली ताकद भाजपला दाखवून दिली.
त्यामुळे आता भाजप नेत्यांनी संघाच्या पदाधिकाऱ्यांच्या नाकदुऱ्या काढण्यास सुरुवात केली आहे. आता विधानसभा निवडणुकीला तरी पूर्ण सहकार्य करा,
अशी विनवणी भाजपच्या नेत्यांकडून संघाच्या पदाधिकाऱ्यांना करण्यात आली. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या मदतीची भाजपला गरज आहे.
त्यामुळे किमान यापुढे तरी त्यांच्यावर टीका टाळा, अशीदेखील विनंती भाजप नेत्यांनी संघाकडे केल्याचं वृत्त दिव्य मराठीनं सुत्रांच्या हवाल्यानं दिलं आहे.
लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर संघानं भाजपची चांगलीच कानउघाडणी. संघाशी संबंधित ऑर्गनायझर आणि विवेक या नियतकालिकांमधून भाजपच्या धोरणांवर टिकेची झोड उठवण्यात आली.
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सोबत घेतल्याचा कसा तोटा झाला, याचं विश्लेषण करणारे लेख प्रसिद्ध झाले. भाजपचे कार्यकर्ते आणि
पाठिराखे यांच्या भावना मांडण्यात आल्याचं सांगण्यात आलं. यावरुन संघ आणि भाजप अजित पवारांवर महायुतीतून बाहेर पडण्यासाठी दबाव टाकतोय का, असा प्रश्न निर्माण झाला.
संघ अजित पवार आणि भाजपच्या हातमिळवणीमुळे नाराज असला तरी भाजपचे नेते मात्र अजित पवारांशी केलेल्या युतीचा फेरविचार करण्यास तयार नाहीत.
गृहमंत्री अमित शहांची नुकतीच पुण्यात सभा झाली. त्यात त्यांनी अजित पवार गटासह महायुतीच्या नेत्यांना विजयी करण्याचं आवाहन केलं.
संघानं वारंवार सांगून, नाराजी व्यक्ती करुनही भाजप अजित पवारांची साथ सोडण्यास तयार नसल्याचं चित्र आहे. त्यामुळे संघ परिवारात नाराजी कायम आहे.