जागावाटपापूर्वीच ठाकरे गटाकडून दोन उमेदवार जाहीर,आघाडीत ठिणगी ?
Two candidates announced by the Thackeray group even before the seat distribution, a spark in the alliance?
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात महाविकास आघाडीचे जागावाटप बाकी असतानाच शिवसेना ठाकरे गटाकडून नाशिकमधील
दोन विधानसभा मतदारसंघांसाठी परस्पर उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. त्यामुळे महायुतीपाठोपाठ आता महाविकास आघाडीतही मिठाचा खडा पडण्याची शक्यता आहे.
शिवसेना ठाकरे गटाच्या नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघासाठी बोलावण्यात आलेल्या बैठकीत नाशिक पश्चिममधून जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांना,
तर नाशिक मध्यमधून माजी आमदार वसंत गिते यांना उमेदवारी देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला असून, तो पक्षश्रेष्ठींकडे पाठविला जाणार आहे.
लोकसभा निवडणूक आटोपल्यानंतर महाविकास आघाडीसह महायुतीचे घटकपक्ष आता विधानसभा निवडणुकीच्या कामाला लागले आहेत.
लोकसभा निवडणुकीत भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता न आल्याने महायुतीने आता विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रित केले आहे.
महायुतीच्या घटकपक्षांनीही नाशिक जिल्ह्यातील एकमेकांच्या विधानसभा मतदारसंघांवर दावा ठोकायला सुरुवात केली असताना त्याचे लोण आता महाविकास आघाडीतही पोहोचले आहे.
नाशिक जिल्ह्यातील तीनही लोकसभा मतदारसंघ महाविकास आघाडीच्या पारड्यात पडले आहेत. नाशिक लोकसभेत तर शिवसेना ठाकरे गटाच्या राजाभाऊ वाजेंनी शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसेंचा पराभव केल्याने
ठाकरे गटाचा आत्मविश्वास चांगलाच उंचावला आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून भगवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून,
त्या पार्श्वभूमीवर गुरुवारी नाशिक पश्चिम मतदारसंघाची ठाकरे गटाची बैठक पार पडली. या बैठकीत महाविकास आघाडीचे जागावाटप होण्यापूर्वीच ठाकरे गटाकडून परस्पर उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
नाशिक पश्चिम मतदारसंघावर ठाकरे गटाने दावा ठोकला असला, तरी या मतदारसंघावर काँग्रेसने आधीच दावा सांगितला आहे.
गत निवडणुकीत काँग्रेसच्या डॉ. हेमलता पाटील यांनी उमेदवारी करीत भाजप आमदार देवयानी फरांदेंसमोर कडवे आव्हान उभे करून दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवली होती.
त्यामुळे आताही डॉ. पाटील यांच्यासह काँग्रेसमधील इच्छुकांनी या मतदारसंघात अप्रत्यक्षपणे प्रचाराला सुरुवात केली आहे.
दुसरीकडे नाशिक पश्चिममध्येही राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून इच्छुकांची चाचपणी सुरू आहे. त्यामुळे जागावाटप होण्याआधीच बडगुजर, गितेंच्या उमेदवारीवरून आता ‘मविआ’तही वादाची ठिणगी पडली आहे.