महाविकास आघाडीत मुख्यमंत्रीपदावरुन मतभेद
Disagreement over Chief Minister's post in Mahavikas Aghadi

महाविकास आघाडीत मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यावरुन मतभेद असल्याची माहिती समोर येत आहे. महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं तेव्हा शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होते.
तसेच मुख्यमंत्रीपदाच्या अटीवरुनच उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाण्याचा निर्णय विधानसभेच्या 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर घेतला होता.
यानंतर मविआचं सत्ता स्थापन झालं आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनले. पण त्यानंतर अडीच वर्षांनी सरकार कोसळलं. उद्धव ठाकरे यांचा पक्ष फुटला.
यामुळे त्यांचं सर्वाधिक नुकसान झालं आहे. या सर्व घडामोडींनंतर राज्यात पुढच्या दोन महिन्यांनी निवडणुका येऊ घातलेल्या आहेत.
या निवडणुकीत महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे हेच किंवा ठाकरे गटाचा नेता हा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असावा, अशी ठाकरे गटाची आग्रही भूमिका आहे.
पण काँग्रेसचा त्याला विरोध असल्याचं स्पष्ट दिसत आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी तर उघडपणे याबाबत भूमिका मांडली आहे.
महाविकास आघाडीत मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यावरुन मतभेद आहेत. मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठेवून विरोधी पक्ष कधी लढत नाही, असं काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण म्हणाले आहेत.
ज्या पक्षाला जास्त जागा त्या पक्षाचा मुख्यमंत्री हे सूत्र असेल, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले आहेत. दुसरीकडे ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनीदेखील याबाबत महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.
सत्ताधारी असो किंवा विरोधक, मुख्यमंत्रीपदासाठी चेहरा लागतोच, असं संजय राऊत म्हणाले आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याविरोधात आवाज उठवला.
कोणतीही पर्वा न करता राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांनी आवाज उठवला. लोकसभेला राहुल गांधींना चेहरा बनवता आलं असतं, असं संजय राऊत म्हणाले.
निवडणुकीला आपण सामोरं जातो तेव्हा कुणीही चेहरा प्रोजेक्ट करत नाहीत. चेहऱ्याची गरज नाही. आम्ही महाविकास आघाडीच्या जाहिरनाम्यावर निवडणूक लढणार आहोत.
आम्ही सध्या जाहिरनामा पूर्ण करणार आहोत. अशी काही परंपरा नाही. तसेच त्याला मान्यता मिळेल असं मला काही वाटत नाही. परंपरा अशी आहे की,
निवडणूक झाल्यावर ज्या पक्षाच्या जास्त जागा येतील त्या पक्षाला मुख्यमंत्रीपद मिळतं. कुठल्या नेत्याला मुख्यमंत्री करायचं ते पक्षाचे नेते ठरवतात, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
“सत्ताधारी असो किंवा विरोधक, मुख्यमंत्रीपदासाठी चेहरा लागतोच”, अशी महत्त्वाची भूमिका संजय राऊत यांनी मांडली. “उद्धव ठाकरे सातत्याने जेव्हा या देशात मोदी-शाह यांच्या अत्याचार आणि अन्यायाविरुद्ध कुणी आवाज उठवत नव्हतं
तेव्हा या देशात राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे सातत्याने कोणतीही पर्वा न करता बोलत होते”, असंदेखील संजय राऊत यावेळी म्हणाले.
दरम्यान, महाविकास आघाडीत एकीकडे मुख्यमंत्रीपदाबाबत रस्सीखेच सुरु असली तरी काही गोष्टी योग्यप्रकारे घडताना दिसत आहेत.
आगामी विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागांवर यश मिळावं यासाठी महाविकास आघाडीने प्रचाराचा प्लॅन आखला आहे. काँग्रेस नेत्यांचा उद्यापासून मराठवाडा आणि विदर्भ दौरा सुरु होईल.
महाविकास आघाडीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा 16 ऑगस्टला मुंबईत मेळावा होणार आहे. यावेळी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे,
माजी केंद्रीय मंत्री शरद पवार आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले मविआच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतील. त्यानंतर मविआची 20 ऑगस्टला मुंबईत सभा आयोजित करण्यात आली आहे.
या सभेला काँग्रेस नेते राहुल गांधी हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत. यावेळी महाविकास आघाडीच्या प्रचाराचा नारळ फुटणार आहे.