अजित पवार बारामती सोडणार ,या मतदारसंघातून लढण्याची तयारी
Ajit Pawar will leave Baramati, preparing to contest from this constituency

आगमी विधानसभा निवडणुकीत आपला बालेकिल्ला असलेल्या बारामती मतदारसंघातून लढणार नसल्याचे संकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा अजित पवार यांनी दिले आहेत.
अजितदादांनी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना बारामती विधानसभा मतदारसंघात त्यांचे चिरंजीव जय पवार रिंगणात उतरु शकतात, अशा आशयाचे सूचक वक्तव्य केले. बारामतीत जय पवार यांना निवडणुकीला उभे करायचे की नाही,
याचा निर्णय पक्षाचे कार्यकर्ते आणि संसदीय मंडळ घेईल, असे सांगत अजित पवार यांनी एकप्रकारे बारामती मतदारसंघावरील दावा सोडल्याचे बोलले जात आहे.
मात्र, अजित पवार यांनी बारामतीमधून निवडणूक लढवली नाही तर मग ते दुसऱ्या कोणत्या मतदारसंघातून लढणार, असा प्रश्न साहजिकच उपस्थित झाला होता.
याबाबत आता एक मोठी अपडेट समोर येत आहे. अजित पवार हे विधानसभा निवडणुकीत मोठा डाव टाकण्याच्या तयारीत असून तो रोहित पवार यांच्यासाठी मोठा शह ठरु शकतो. कारण अजित पवार
हे आगामी विधानसभा निवडणुकीत नगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड मतदारसंघातून रिंगणात उतरण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
गेल्या विधानसभा निवडणुकीत कर्जत-जामखेड मतदारसंघात भाजपच्या राम शिंदे यांचा पराभव करत रोहित पवार पहिल्यांदा विधानसभेवर निवडून गेले होते.
परंतु, यंदा अजितदादा कर्जत-जामखेडमधून रिंगणात उतरल्यास रोहित पवार यांच्यासमोर प्रचंड मोठे आव्हान उभे राहू शकते.
अजित पवार हे कर्जत-जामखेड मतदारसंघातून निवडणुकीला उभे राहू शकतात, अशी चर्चा रोहित पवार यांच्या ट्विटमुळे सुरु झाली. अजित पवार यांनी नुकतीच,
‘बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांच्याविरोधात माझ्या पत्नीला उभे करणे ही चूक होती’, अशी जाहीर कबुली एका मुलाखतीत दिली होती. अजितदादांच्या या कबुलीनंतर रोहित पवार यांनी एक ट्विट केले होते.
या ट्विटमध्ये रोहित पवार यांनी म्हटले होते की, खा. सुप्रियाताईंच्या विरोधात सुनेत्रा काकींना उमेदवारी देण्याचा निर्णय दादांचा असूच शकत नाही अशी खात्री होती.
ती चूक होती म्हणून एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत त्याची तुम्ही कबुली दिली, परंतु तुमचे मित्रपक्ष मात्र उलट प्रचार करत हा दादांचाच निर्णय असल्याचे सांगतात.
याला तुम्ही ‘चूक झाल्याचे नाव देत असलात’ तरी प्रत्यक्षात हा दिल्लीत बसलेल्या गुजरातच्या नेत्यांचा दबाव होता. आता विधानसभेला
‘असाच दबाव माझ्या मतदारसंघाच्या बाबतीत आपल्यावर असल्याची’ चर्चा आहे, असे रोहित पवार यांनी ट्विटमध्ये म्हटले होते.
विधानसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघात अजित पवार यांच्याऐवजी त्यांचे पुत्र जय पवार रिंगणात उतरतील, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे.
याबाबत अजित पवार यांना विचारणा केली असता त्यांनी म्हटले की, शेवटी आपल्याकडे लोकशाही आहे. मला रस नाही. मी सात-आठ निवडणुका केल्यात.
त्यांच्यासंदर्भात (जय पवार) जनता आणि कार्यकर्त्यांची मागणी असेल तर राष्ट्रवादी काँग्रेसचे संसदीय मंडळ निर्णय घेतली. जनता, कार्यकर्ते आणि पार्लामेंटरी बोर्ड जो काही निर्णय घेईल, तो आम्हाला मान्य आहे, असे अजित पवार यांनी म्हटले.