‘मिचांग’ चक्रीवादळामुळे देशावर अस्मानी संकट, या राज्यांमध्ये अलर्ट जारी
Due to Cyclone 'Michang' the country is in dire straits, alert issued in these states

देशात वातावरणात मोठे बदल घडले असून आणखी एक चक्रीवादळ धडकणार आहे. भारतीय हवामान विभाग ने बुधवारी यासंबंधी अलर्ट जारी केला आहे.
आग्नेय बंगालचा उपसागर आणि लगतच्या दक्षिण अंदमान समुद्रावरील कमी दाबाचे क्षेत्र तीव्र झाले आहे. यानंतर ३० नोव्हेंबरपर्यंत दक्षिण-पूर्व बंगालच्या उपसागरात हळूहळू ते कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतरित होऊन पश्चिम-वायव्य दिशेने सरकण्याची चिन्हं आहेत.
२ डिसेंबरपर्यंत नैऋत्य आणि लगतच्या आग्नेय बंगालच्या उपसागरात ‘मिचांग’ चक्रीवादळात तीव्र होण्याची शक्यता आहे. या मिचांग वादळामुळे अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात पुढील ३ दिवस पाऊस आणि वादळी वाऱ्याचा इशारा देण्यात आला आहे.
इतकंच नाहीतर पुढील २ दिवस पश्चिम हिमालयीन प्रदेश आणि लगतच्या मैदानांवर नवीन वेस्टर्न डिस्टर्बन्सचा परिणाम होऊ शकतो.
IMD नुसार, २९, ३० नोव्हेंबर रोजी जम्मू-काश्मीर, लडाख, गिलगिट-बाल्टिस्तान आणि हिमाचल प्रदेशमध्ये मुसळधार पाऊस पडेल. तर यावेळी बर्फवृष्टीचा इशाराही देण्यात आला आहे.
पुढील तीन दिवस वायव्य भारतातील मैदानी भागात हलका पाऊस पडू शकतो. मध्य प्रदेश आणि विदर्भात हलका ते मध्यम पाऊस आणि वादळी वाऱ्याचा इशारा देण्यात आला आहे.
२९ आणि ३० नोव्हेंबर रोजी मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात हलका पाऊस पडू शकतो. तर ३० नोव्हेंबर रोजी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे.
पुढील ५ दिवसांत दक्षिण भारतात हलका ते मध्यम पाऊस आणि वादळी वाऱ्याचा इशारा देण्यात आला आहे. तामिळनाडू, पुद्दुचेरी, कराईकल, केरळ आणि माहे इथे पुढील ५ दिवस पाऊस होऊ शकतो.
२९ नोव्हेंबर ते ३ डिसेंबर दरम्यान तामिळनाडू, पुद्दुचेरी, कराईकलमध्ये मुसळधार पाऊस पडेल. त्याचबरोबर केरळ आणि ३० नोव्हेंबर आणि १ डिसेंबरला आणि आंध्र प्रदेश आणि यानाममध्ये २ आणि ३ डिसेंबरला मुसळधार पाऊस पडेल.