अजित पवार गट -शिवसेनेत जुंपली

Ajit Pawar group - Shiv Sena joined forces

 

 

 

राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा शिवसेनेच्या शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटासंदर्भात एक विधान केलं आहे.

 

राष्ट्रवादी काँग्रेसशी आपले आयुष्यभर पटलं नसून आता त्यांच्याबरोबर सत्तेत मांडीला मांडी लावून बसावं लागतं त्यामुळे बैठकीतून बाहेर पडलो की उलट्या होतात, असे ते म्हणाले.

 

त्यांच्या या विधानानंतर आता विविध चर्चांना उधाण आलं आहे. यावर राजकीय प्रतिक्रियाही उमटू लागल्या आहेत. अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनीही मंत्री तानाजी सावंत यांच्यावर खोचक शब्दांत टीका केली आहे.

 

अमोल मिटकरी यांनी एक्स या समाज माध्यमावर पोस्ट करत यासंदर्भात प्रतिक्रिया दिली. जे खेकड्यामुळे धरण फुटले म्हणू शकतात, ते काहीही बोलू शकतात, असा टोला त्यांनी तानाजी सावंत यांना लगावला आहे.

 

“जे खेकड्यामुळे धरण फुटले म्हणू शकतात, हाफकिन संस्थेला माणूस म्हणू शकतात, इतकंच काय त्यांच्या भैरवनाथ साखर कारखान्याचे उद्घाटन

 

अजित पवार यांच्या हस्ते करू शकतात, अजित पवारांकडून निधी घेऊ शकतात, ते काहीही बोलू शकतात”, असे अमोल मिटकरी म्हणाले.

 

याशिवाय माध्यमांशी बोलताना, “तानाजी सावंत राज्याचे आरोग्यमंत्री आहेत. त्यांना उलट्या कोणत्या कारणामुळे होतात, याबाबत कल्पना नाही. उलट्यांचा त्यांच्या आरोग्याशी काही संबंध असू शकेल.

 

पण महायुतीत असल्यामुळे उलट्या होत असतील, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीच त्यांचा इलाज करावा”, अशी प्रतिक्रियाही त्यांनी यांनी दिली.

 

अमोल मिटकरींबरोबरच अजित पवार गटातील इतर नेत्यांनीही तानाजी सावंत यांच्या विधानावर नाराजी व्यक्त केली आहे. “तानाजी सावंत यांचे ऐकून घेण्यापेक्षा महायुतीतून बाहेर पडू, आपल्याला सत्तेची गरज नाही.

 

तानाजी सावंत यांचा बोलण्याचा काय संबंध आहे? एकनाथ शिंदे यांना भाजपाने मुख्यमंत्री केले त्यामुळे तानाजी सावंत यांना मंत्रीपद मिळाले. त्याच भाजपाच्या नेत्यांनी अजित पवार यांना महायुतीमध्ये घेतले.

 

हा निर्णय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि भाजपाने घेतला होता. महायुतीमुळेच तानाजी सावंत मंत्री आहेत. हे त्यांनी विसरू नये”,

 

अशी प्रतिक्रिया अजित पवार गटाचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी दिली. तसेच “या पद्धतीने जर राष्ट्रवादीला कोण बोलणार असेल तर आम्ही सत्तेत राहणार नाही”, असा इशाराही त्यांनी दिला.

 

दरम्यान, धाराशिव येथील एका कार्यक्रमात बोलताना तानाजी सावंत अजित पवार गटाबाबत एक विधान केलं होतं. “मी हाडामासाचा शिवसैनिक आहे.

 

आयुष्यात कधीही काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी माझे जमलेले नाही. शिक्षण घेत असल्यापासून मला त्यांचे पटलेले नाही. आज जरी मंत्रिमंडळात

 

आम्ही त्यांच्या मांडीला मांडी लावून बसलो असलो तरी बाहेर आल्यानंतर उलट्या होतात. हे सहन होत नाही”, असे ते म्हणाले होते.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *