छगन भुजबळांनी अजितदादांसमोर ओबीसी आरक्षणाचा मुद्दा ठासून मांडला
Chhagan Bhujbal strongly raised the issue of OBC reservation before Ajit Dada
ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्यास ठामपणे विरोध करणाऱ्या छगन भुजबळ यांनी शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) राष्ट्रीय अधिवेशनाच्या व्यासपीठावरुन आपली भूमिका पुन्हा एकदा अधोरेखित केली.
आपला मराठा आरक्षणाला विरोध नाही. मात्र, इतरांच्या वाट्याचं आरक्षण मराठा समाजाला देण्यास विरोध आहे, असे छगन भुजबळ यांनी ठणकावून सांगितले.
यावेळी त्यांनी कोणताही मुलाहिजा न बाळगता मराठा आंदोलनावेळी बीडमध्ये झालेली जाळपोळ आणि मराठा समाजाकडून नेत्यांना करण्यात आलेल्या गावबंदीविरोधात परखडपणे मतप्रदर्शन केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, राहुल गांधी हे ओबीसी समाजाला महत्त्व देतात. तेलंगणात भाजपची सत्ता आल्यास ओबीसी मुख्यमंत्री करु, असे आश्वासन पंतप्रधान मोदी यांनी दिले होते.
तर राहुल गांधीही जातनिहाय जनगणना करा, असे म्हणतात. यावरुन ओबीसी समाजाचं महत्त्व अधोरेखित होतं, असे छगन भुजबळ यांनी सांगितले.
बीडमध्ये मराठा आंदोलनावेळी जाळपोळ करण्यात आली. त्यावेळी दगडफेक करण्याची काय गरज होती? गावठी पिस्तुलाची काय गरज होती? मला या विषयावर आता बोलायचे नव्हते.
पण आमदारांच्या घरांची जाळपोळ करण्यामागे कोणाचं षडयंत्र आहे, हे शोधून काढण्याची गरज आहे, हे मी अजितदादांना सांगू इच्छितो, असे छगन भुजबळ यांनी म्हटले.
जे काही प्रश्न असतील ते एकत्र बसून सोडवा. कायदा हातात घेऊन काही करु नका. सरकारला वेठीला धरताना तुम्ही जनतेलाही वेठीला धरता, हे लक्षात घ्या.
राज्यकर्ता हा सगळ्यांचा असतो, एका समाजाचा नसतो. आम्ही शिवसेनेत असल्यापासून कधीही जातीयवाद केला नाही. राज्यकर्ता हा समाजातील लहान-मोठे, अल्पसंख्याक, अशा सगळ्यांचा असतो. सगळ्यांना समान न्याय मिळाला पाहिजे, असे छगन भुजबळ यांनी सांगितले.
अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. डोळ्यासमोरचं पीक हातातून गेल्यामुळे शेतकरी आणि त्यांचे कुटुंबीय ओक्साबोक्सी रडत आहेत. मंत्रिमंडळाच्या बैठकीत या शेतकऱ्यांना भरघोस मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला.
पण अशावेळी शेतकऱ्यांचे अश्रू पुसायला जाणे, हे राज्यकर्त्यांचे कर्तव्य आहे. त्यासाठीच मी अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या भागात पाहणीसाठी गेलो होतो.
मात्र, त्याठिकाणी काहीजणांनी काळे झेंडे दाखवत ‘चले जाव’चे नारे दिले. मी म्हटलं, हे झेंडे आणि राजकारण नंतर बघू. आमचा शेतकरी रडतोय,
त्यांचे अश्रू पुसायला एकत्र या. पण ते म्हणाले नाही गावबंदी आहे. इतर वेळेला राजकारण ठीक आहे. पण शेतकरी संकटात असताना अशाप्रकारे राजकारण करणे योग्य नाही, असे छगन भुजबळ यांनी संबंधितांना सुनावले.
आपल्या भाषणात छगन भुजबळ यांनी अजित पवार यांच्या मुख्यमंत्रीपदाविषयी भाष्य केले. अजित पवार यांना मुख्यमंत्री करण्याचे स्वप्न पूर्ण करायचे असेल तर आपल्याला दलित, अल्पसंख्याक, आदिवासी, ओबीसी आणि मराठा समाजाला एकत्र घेण्याची गरज आहे.
अजित पवार यांच्याकडे ही दुरदृष्टी आहे. अजित पवार यांनी कधीही एकमार्गी काम केले नाही. त्यांनी सर्वसमावेशक मंत्रिमंडळ तयार केले, असे छगन भुजबळ यांनी सांगितले.