परभणी,नांदेड,हिंगोलीत मुसळधार; २००हून अधिक नागरिकांचे स्थलांतर

Heavy rains in Parbhani, Nanded, Hingoli; Migration of more than 200 citizens

 

 

 

मराठवाड्यात सप्टेंबर महिन्यात जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. त्यानुसार नांदेड, परभणी व हिंगोलीत शनिवारी मध्यरात्रीपासून पावसाने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे.

 

हिंगोलीत घरात पावसाचे पाणी शिरल्याने २००हून अधिक नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. नांदेडमध्ये शहरात पाच तालुक्यांत अतिवृष्टी झाली आहे.

 

२४ तास उलटून गेले तरी रविवारी रात्री उशिरापर्यंत पाऊस सुरू होता. परभणीतही जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. बीड जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यांत मोठ्या पावसाने हजेरी लावली आहे.

 

हिंगोलीत हाहाकार

हिंगोली जिल्ह्यात पावसाने हाहाकार उडाला आहे. रविवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले असून, हिंगोलीतून वाहणारी कयाधू नदी ओसंडून वाहत आहे.

 

रविवारी पहाटे पाच ते दुपारी दोन वाजेपर्यंत मुसळधार पाऊस झाला. पावसाचा सर्वाधिक परिणाम शहरात दिसून आला. शहरातील सर्वच रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर पाणी वाहत होते.

 

पालिकेने दहा वेगवेगळ्या टीम तयार करून जेसीबी मशिन पाठवले होते. लोकांकडून माहिती मिळताच पालिका कर्मचाऱ्यांनी

 

तेथे जाऊन जेसीबीद्वारे पाणी काढले. गेल्या पंधरा वर्षांत प्रथमच कयाधू नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आल्याचे रहिवाशांनी सांगितले.

 

परभणी जिल्ह्यात शनिवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. दैठणा परिसरात ढगफुटीसारखा पाऊस पडल्याने दैठणा ते माळसोन्ना रस्त्यावर पाणी साचले होते.

 

परिणामी, हा मार्ग वाहतुकीसाठी बंद झाल्याने वाहतूक व्यवस्था ठप्प झाली होती. परभणी जिल्ह्यात रविवारी सकाळी साडेदहा वाजेपर्यंत सरासरी २०.८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

 

नांदेड जिल्ह्यात शनिवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे हदगाव, भोकर, किनवट, माहूर व हिमायतनगर या तालुक्यांसह २६ महसूल मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली.

 

जिल्ह्यात रविवारी सकाळी साडेआठला संपलेल्या २४ तासांत सरासरी ५६.१० मिलिमीटर पाऊस झाला. हा पाऊस १२ मंडळांत १०० मिलिमीटरपेक्षा अधिक झाला.

 

या पावसामुळे खरीपातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची भीती व्यक्त होत आहे. पैनगंगा नदीवरून पाणी वाहत असल्याने वाहतूक काही काळ बंद होती.

 

तेलंगणा राज्यातील कामारेड्डी रेल्वे पुलावरून पाणी वाहत असल्याने नांदेड-निजामाबाद रेल्वेसेवा काही काळ विस्कळित झाली होती. जिल्ह्यात १२ जनावरांचा अतिवृष्टीने मृत्यू झाला. २९ घरांची पडझड झाल्याचे प्रशासनाने कळविले.

 

 

बीड शहराला पाणीपुरवठा करणारे बिंदुसरा धरण शनिवारी भरले होते. रविवारच्या पावसानंतर धरणातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग होत आहे.

 

नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिला आहे. लातूर शहर व जिल्ह्यात दिवसभर पावसाची रिपरिप सुरु होती.

 

मांजरा धरणातील पाणीपातळी ४०.५८ टक्के आहे. औसा, निलंगा, उमरगा या तालुक्यांना पाणीपुरवठा असलेल्या होत असलेल्या निम्न तेरणा धरणातील पाणीपातळी ३५ टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे.

 

छत्रपती संभाजीनगर शहरात सायंकाळपर्यंत ४.५ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली. जायकवाडी धरणात सायंकाळी सहापर्यंत ८४.९० टक्के पाणीसाठा झाला होता.

 

१६ हजार २०२ क्युसेक आवक सुरू होती. जायकवाडीतून उजव्या कालव्यात माजलगावसाठी ७०० क्युसेक विसर्ग सुरू होता.

 

 

यवतमाळ जिल्ह्यात शनिवारी रात्रीपासून झालेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळित झाले आहे. पावसाने अनेक घरांची पडझड झाली आहे.

 

पुराचे पाणी शेतात शिरल्याने हजारो हेक्टर जमीन पाण्याखाली आहे. महागाव, दिग्रस, पुसद, उमरखेड तालुक्यांना जास्त फटका बसला आहे. जिल्ह्यातील ५७ मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली.

 

यवतमाळ शहरात शनिवार सायंकाळपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली. रात्री विजेचा कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. रविवारी सकाळी पाऊस कमी झाल्यावर दुपारी काही वेळ पाऊस बरसला.

 

उमरखेड तालुक्यातील मराठवाड्याच्या सीमेवर असलेल्या अनेक गावांत ढगफुटीसारखा पाऊस झाला. पैनगंगा नदी दुथडी भरून वाहत असल्याने नदी काठावरील गावकऱ्यांनी जीव मुठीत घेऊन रात्र काढली.

 

जंगल भागातील कोरटा, चिखली, दराटी गावातील अनेक घरांना पुराचा फटका बसला आहे. नाल्याच्या पुरात एक म्हैस व ट्रॅक्टर वाहून गेले. अनेकांच्या घरातील धान्य व भांड्यासह इतर महत्त्वाच्या वस्तू वाहून गेल्या आहे.

 

चिखली, कोरटा, मोरचण्डी, एकंबा, जवराळा, जांब गावातील शेतशिवारात नाल्याचे पाणी शिरल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. दिग्रस तालुक्यातील अनेक

 

गावांना पुराचा फटका बसला. तर पुसद शहराला देखील पुराचा अधिक फटका बसला आहे. सुभाष चौकात छातीपर्यंत पाणी साचले होते. अनेक दुकानांत पाणी शिरले.

 

पुसद-वाशीम मार्गावर खंडाळा घाटात रात्री मुसळधार पाऊस झाल्याने दरड कोसळल्याने रविवारी पुसद-वाशीम मार्गावरील वाहतूक काही वेळ बंद होती.

 

जेसीबीच्या साह्याने मलबा हटविल्यावर वाहतूक दुपारनंतर सुरू झाली; तसेच पूस नदीला पूर आल्याने पुलावरून पाणी वाहत असल्याने सकाळपासून पुसद-यवतमाळ मार्ग बंद होता.

 

पुसद तालुक्यातील बोरखडी कोपरा येथे पुरात अडकलेल्या अरुण मुडाणकर या शेतकऱ्याला वाचविण्यात आपत्ती व्यवस्थापन पथकाला यश मिळाले आहे.

 

पुराचे पाणी शेतात शिरल्याने शेतकरी अरुण शेडमध्ये बचावासाठी गेले; पण शेडमध्ये पाणी वाढल्याने ते झाडावर जाऊन बसले. दुर्दैवाने झाड विहिरीत कोसळले.

 

अरुणही विहिरीत कोसळले. मात्र नशीब बलवत्तर म्हणून ते विहिरीमध्ये असलेल्या पाइपवर चढून वर आले. मात्र, चोहीकडे पाणीच

 

पाणी असल्याने अडकून पडले. आपत्ती व्यवस्थापन पथकाला माहिती मिळाल्यावर पथक घटनास्थळी पोहचले. त्यांनी अरुणला सुखरूप बाहेर काढले.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *