शरद पवारांचा भाजपला मोठा धक्का,आज मोठा नेता तुतारी फुंकणार
Sharad Pawar's big blow to BJP, big leader will blow trumpet today

भाजपला धक्का देत समरजित घाटगे उद्या शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत. कागलमध्ये होणाऱ्या शरद पवारांच्या सभेत त्यांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडणार आहे.
समरजित घाटगे शरद पवार गटात जाणार असल्यानं कोल्हापुरात भाजपला मोठा धक्का बसणार आहे. भाजपचे समरजित घाटगे 18 माजी नगरसेवकांसह कागलमध्ये तुतारी फुंकणार आहेत.
उद्या कागलमध्ये होणाऱ्या सभेत शरद पवारांच्या उपस्थितीत समरजित घाटगेंचा शरद पवार गटात पक्षप्रवेश होणार आहे.
महायुतीत कागलची जागा अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीची आहे. मात्र, दुसरीकडे कागलमध्ये शरद पवारांकडे उमेदवार नव्हता.
त्यामुळे आता समरजित घाटगे शरद पवार गटात प्रवेश करणार असून ते कागलमधून निवडणुकीच्या मैदानात उतरु शकतात.
कागलमध्ये सध्या अजित पवार गटाचे हसन मुश्रीफ हे आमदार आहेत. त्यामुळे विधानसभेत कागलमधून हसन मुश्रीफ आणि समरजित घाटगेंमध्ये सामना होऊ शकतो.
कोल्हापूर जिल्ह्यात समरजित घाटगेंचा दांडगा जनसंपर्क आहे. कोल्हापूर भाजप जिल्हाध्यक्ष म्हणून देखील त्यांनी काम केलंय. मात्र, आता ते शरद पवार गटात जाणार असल्यानं कोल्हापुरात भाजपला मोठा झटका बसणार आहे.
2019 कागल विधानसभेत तिरंगी लढत पाहायला मिळाली होती. राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ, अपक्ष उमेदवार समरजित घाटगे आणि शिवसेनेचे संजय घाटगे हे मैदानात होते.
या निवडणुकीत हसन मुश्रीफांना 1 लाख 16 हजार 436 मतं मिळाली होती. तर अपक्ष लढत असलेल्या समरजित घाटगेंना 88 हजार 303 मतं मिळाली होती.
तर शिवसेनेचे उमेदवार संजय घाटगेंना 55 हजार 657 मतं मिळाली होती. जवळपास 28 हजार मतांनी हसन मुश्रीफांनी विजय संपादन केला होता.
भाजपला धक्का देत समरजित घाटगे उद्या तुतारी हातात घेणार आहेत. त्यामुळे आगामी विधानसभेत कागलमधून हसन मुश्रीफांना समरजित घाटगे तगडं आव्हान देण्याची शक्यता आहे.