अजित पवार गटाकडून लोकसभेच्या या 4 जागा जाहीर
These 4 Lok Sabha seats have been announced by Ajit Pawar group
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लोकसभा निवडणुकीबाबत मोठी घोषणा केली आहे. “मार्च 2024 मध्ये पहिल्या आठवड्यात लोकसभा निवडणूक जाहीर होतील, असा माझा अंदाज आहे.
सातारा, शिरुर, रायगड आणि बारामती या लोकसभेच्या जागा लढवणार आहोत”, असं अजित पवार म्हणाले. कर्जत येथे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शिबीर सुरु आहे. या शिबिरात अजित पवारांनी ही घोषणा केली.
“आपल्याकडे असणाऱ्या चार जागा बारामती, शिरूर, सातारा आणि रायगड या आपण लढवणार आहोतच. परंतु इतर ज्या जागा आहेत त्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेकडे आहेत
त्याच्यात पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद असेल तर तिथं भाजप आणि शिंदे साहेबांशी चर्चा करून आपल्याला जागा वाटप करता येईल” असं अजित पवार म्हणाले
दरम्यान, अजित पवार यांनी ज्या चार जागा लढवण्याची घोषणा केली आहे, त्या चारही जागी सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आहेत. यामधील तीन ठिकाणी शरद पवार गटाचे तर एक ठिकाणी अजित पवार गटाचा खासदार आहे.
बारामतीत सुप्रिया सुळे, शिरुरमध्ये अमोल कोल्हे आणि साताऱ्यात श्रीनिवास पाटील हे शरद पवार गटाचे खासदार आहेत. तर रायगड लोकसभेत सुनील तटकरे हे अजित पवार गटाचे खासदार आहेत. या चारही जागा अजित पवार गट लढवणार असल्याची घोषणा आज करण्यात आली.
लोकसभेच्या जागावाटपाबाबत आम्ही सर्व मिळून चर्चा करुन ठरवू. आम्ही अमित शाह साहेब असतील, देवेंद्र फडणवीस असतील, चंद्रशेखर बावनकुळे असतील किंवा एकनाथराव शिंदे असतील आमची थोडीशी प्राथमिक चर्चा झाली.
परंतु या पाच राज्यांच्या सध्या निवडणुका चालू आहेत. त्याच्यानंतर आपण बसूया अशा पद्धतीने आम्हा लोकांचं ठरलेलं आहे. त्याच्यात इलेक्टिव्ह मेरिट पाहू, त्या त्या भागामध्ये त्या त्या कार्यकर्त्याचं काम पाहून,
आपण आपली सगळी ताकद NDA च्या मागे लावू. सगळे घटक पक्षांना बरोबर घेऊन महाराष्ट्रामध्ये चांद्यापासून बांद्यापर्यंत या लोकसभेच्या निवडणुकीचा काम करायचे आहे, असं अजित पवार म्हणाले.
या शिबिराला अनेकांना यायचं होतं. कार्यकर्ते जे पक्षाच्या करता काम करतोय, आम्ही जिवाचं रान करतोय असं ज्यांना वाटतं, त्यांना शिबिराला यावं वाटणं साहजिक आहे.
पण जागेची मर्यादा पाहून प्रत्येकाला येता आलं नाही. मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, कोकण या भागातल्या माझ्या सहकाऱ्यांना,
माझ्या मुंबईतल्या सहकाऱ्यांना यायचं होतं. आमची पण इच्छा होती शेवटी कार्यकर्ते असले तर संघटना मजबूत होत असते. कार्यकर्ता संघटनेचा कणा असतो. त्याच्यामुळे संघटना वाढत असते.
पुढे आपल्याला दिवस कमीच आहेत. कारण माझा अंदाज आहे, मी काही ज्योतिषी नाही, माझा अंदाज आहे की मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये लोकसभेची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. मागचा जर रेकॉर्ड बघितला 2014, 2019, 2009, 2004 तर साधारण त्या काळामध्ये निवडणुका लागल्या होत्या.
उद्याच्या सात तारखेपासून आपलं हिवाळी अधिवेशन आहे नागपूरला. पुरवणी मागणी आम्ही सादर करून सभागृहात त्या मंजूर करुन घेऊ. आपल्याला NDA ला पूर्ण ताकद लावायची आहे.
NDA च्या विचाराच्या लोकांना तिसऱ्यांदा त्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब व्हावे ही आपल्या सगळ्यांची मनापासूनची इच्छा आहे.
कशा पद्धतीने आपल्याला सगळ्यांना काम करायचं,आपल्या विचारांचे सरकार निवडून आणायचं आहे, त्याकरता माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माझ्या सहित सगळ्यांनी प्रयत्नाची शिकस्त करावी लागणार आहे.